भुवनेश्वर : ओदिशा पोलीस आणि केंद्रीय सुरक्षा दलांनी नाताळच्या दिवशी राबवलेल्या मोठ्या संयुक्त कारवाईत सीपीआय (माओवादी) संघटनेचा सेंट्रल कमिटी सदस्य आणि ओदिशातील माओवादी कारवायांचा प्रमुख कमांडर गणेश उईके याच्यासह एकूण पाच माओवाद्यांचा खात्मा केला. त्यामध्ये दोन महिला कॅडरचा समावेश आहे. गणेश उईकेवर १.१ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.
या बाबत पोलिसांनी सांगितले की, विशेष गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे २३ पथकांचे संयुक्त ऑपरेशन राबवण्यात आले. यात माओवादी कमांडर गणेश उईकेसह चार माओवाद्यांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन महिला माओवाद्यांचाही समावेश आहे. यातील गणेश उईकेवर १.१ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर होते. उर्वरित तीन ठार माओवाद्यांची ओळख अद्याप पटलेली नाही.
चकमक कशी घडली?
ओदिशा पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन ग्रुपची (एसओजी) एक लहान मोबाइल टीम गुम्मा जंगलात शोधमोहीम राबवत होती. याच दरम्यान त्यांचा माओवाद्यांशी सामना झाला. चकमकीदरम्यान माओवादी गणेश उईकेसह ५ जणांचा खात्मा
दोन्ही बाजूंनी जोरदार गोळीबार झाला. यात चार माओवादी ठार झाले. गणेश उइकेच्या मृत्यूनंतर ओदिशातील माओवादी नेटवर्कला मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. सुरक्षा दलांनी परिसरात शोधमोहीम आणखी तीव्र केली असून, उर्वरित माओवादी कॅडरचा शोध सुरू आहे.
शस्त्रसाठा जप्त
चकमकीनंतर पोलिसांनी घटनास्थळावरून एक रिव्हॉल्व्हर, एक ३०३ रायफल, एक वॉकी-टॉकी सेट जप्त केला आहे. या कारवाईत सुरक्षा दलाकडील कोणतीही जीवितहानी झाली नाही. सध्या संपूर्ण परिसरात शोधमोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे.
आत्मसमर्पणानंतर लगेच कारवाई
ही चकमक शेजारच्या मलकानगिरी जिल्ह्यात २२ माओवाद्यांनी ओदिशा पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्यानंतर अवघ्या एका दिवसात घडली आहे. त्यामुळे राज्यातील माओवादविरोधी मोहिमेला मोठे यश मिळाल्याचे मानले जात आहे.