बँकेने मागितला बहिणीच्या मृत्यूचा पुरावा; २० हजारांसाठी भावाने थेट आणला तिचाच सांगाडा, Video 
राष्ट्रीय

बँकेने मागितला बहिणीच्या मृत्यूचा पुरावा; २० हजारांसाठी भावाने थेट आणला तिचाच सांगाडा, Video

ओडिशातील केओंझार जिल्ह्यात मृत बहिणीच्या खात्यातील पैसे काढण्यासाठी एका आदिवासी व्यक्तीने तिचा सांगाडा बँकेत आणल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

किशोरी घायवट-उबाळे

ओडिशातील केओंझार जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मृत बहिणीच्या खात्यातील पैसे काढण्यासाठी एका आदिवासी व्यक्तीने थेट तिचा सांगाडा बँकेत आणल्याची घटना घडली आहे. या घटनेने प्रशासन आणि बँकिंग व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

बँकेत पैसे काढण्यासाठी सांगाड्यासह हजेरी

ही घटना पाटणा ब्लॉकमधील ओडिशा ग्रामीण बँकेच्या मालीपोसी शाखेत घडली. डायनाली गावातील ५० वर्षीय जीतू मुंडा यांनी आपल्या मृत बहिणीचा सांगाडा घेऊन बँकेत प्रवेश केला.

त्यांची ५६ वर्षांची मोठी बहीण कालरा मुंडा यांचे दोन महिन्यांपूर्वी आजारामुळे निधन झाले होते. त्यांनी जनावरे विकून जमा केलेल्या पैशांपैकी २० हजार रुपये काढण्यासाठी जीतू मुंडा अनेक दिवसांपासून बँकेच्या फेऱ्या मारत होते.

'खातेदाराला आणा' म्हणत बँकेचा आग्रह

जीतू मुंडा यांनी सांगितले की, त्यांनी अनेकदा बहिणीच्या मृत्यूबाबत माहिती दिली होती. मात्र, बँक अधिकाऱ्यांनी खातेदाराला प्रत्यक्ष आणल्याशिवाय पैसे देता येणार नसल्याचे सांगितले.

या प्रकारामुळे संतप्त झालेल्या जीतू यांनी बहिणीची कबर उकरून तिचा सांगाडा बाहेर काढला आणि मृत्यूचा पुरावा म्हणून बँकेत आणला.

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. त्यात जीतू मुंडा अर्धनग्न अवस्थेत, प्लास्टिकसदृश पिशवीत अर्धवट झाकलेला सांगाडा घेऊन रस्त्यावरून चालताना दिसत आहेत.

कायदेशीर प्रक्रियेची माहिती नव्हती

पाटणा पोलिस ठाण्याचे निरीक्षक किरण प्रसाद साहू यांनी सांगितले की, जीतू मुंडा निरक्षर आदिवासी असून त्यांना वारसदार किंवा नॉमिनी प्रक्रियेची माहिती नव्हती.

बँक अधिकाऱ्यांनी त्यांना मृत व्यक्तीच्या खात्यातील पैसे काढण्याची योग्य प्रक्रिया समजावून सांगण्यात अपयश आल्याचेही त्यांनी नमूद केले.

पोलिसांकडून मदतीचे आश्वासन

घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जीतू मुंडा यांना आवश्यक मदत देण्याचे आश्वासन दिले. यानंतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सांगाड्याचे पुन्हा अंत्यसंस्कार करण्यात आले.

वारशाचाही मृत, जीतू एकमेव दावेदार

कालरा मुंडा यांच्या खात्यातील वारशाचा अर्थात नॉमिनीचाही मृत्यू झाल्यामुळे जीतू मुंडा हेच एकमेव दावेदार ठरले आहेत. प्रशासनाने आता बँक अधिकाऱ्यांना प्रक्रिया तातडीने पूर्ण करून त्यांना पैसे मिळवून देण्याचे निर्देश दिले आहेत.

दुष्काळाचा ३ टप्प्यांत आढावा; राज्य सरकारकडून मदत; उपाययोजनांना सुरुवात, ५ ऑक्टोबरनंतर पंचनामे होणार

हेक्टरी १ लाख मदत, पूर्ण कर्जमाफी द्या : हर्षवर्धन सपकाळ

पुण्यात दोन CA विरोधात गुन्हा; 'शेल'च्या माध्यमातून ४,४२७ कोटींची करचुकवेगिरी

प्राध्यापकावर कारवाई; IIT मुंबईतील विद्यार्थी आत्महत्येप्रकरणी संस्थेने मागितली माफी; गेल्या २० वर्षांत १६० विद्यार्थ्यांची आत्महत्या

ठाण्याला पावसाने झोडपले; राज्यातील अनेक भागांना यलो अलर्ट