गुरुग्राम : इंडियन नॅशनल लोकदलचे अध्यक्ष आणि हरयाणाचे पाच वेळा मुख्यमंत्रीपद भूषविणारे ज्येष्ठ नेते ओमप्रकाश चौताला यांचे शुक्रवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. त्यांच्या फ्श्चात दोन पुत्र, तीन कन्या असा परिवार आहे. त्यांची पत्नी स्नेहलता यांचे पाच वर्षांपूर्वीच निधन झाले.
माजी उपपंतप्रधान दिवंगत देवीलाल यांचे पुत्र असलेले ओमप्रकाश चौताला यांना निवासस्थानीच हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि हरयाणाचे मुख्यमंत्री नायबसिंग सैनी यांनी चौताला यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. ओमप्रकाश चौताला यांचा जन्म १ जानेवारी १९३५ रोजी झाला. प्राथमिक शिक्षणानंतर त्यांनी शिक्षण सोडून दिले. शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी २०१३ मध्ये त्यांना कारावासाची शिक्षा झाली. वयाच्या ८२ व्या वर्षी ते शालान्त आणि १२ वीची परीक्षा उत्तीर्ण झाले. चौताला यांची २०२१ मध्ये कारागृहातून सुटका करण्यात आली.