नवी दिल्ली : ‘एक देश-एक निवडणूक’ देशासाठी आवश्यक आहे. यामुळे राज्यकारभारातील सातत्य, धोरण लकवा रोखणे, आर्थिक भार कमी होण्यास मदत मिळेल. तसेच या धोरणात देशातील चांगल्या प्रशासनाची हमी देण्याची क्षमता आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले.
76व्या प्रजासत्ताक दिवसाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शनिवारी राष्ट्राला संबोधित केले.
त्या म्हणाल्या की, न्याय, स्वातंत्र्य, समानता आणि बंधुत्व हे केवळ सैद्धांतिक संकल्पना नाहीत. या जीवनमूल्यांचा भाग आपल्या सभ्यता आणि संस्कृतीत होता. भारताच्या प्रजासत्ताकातील मूलभूत मूल्यांचे प्रतिबिंब आपल्याला राज्यघटनेच्या रचनामध्ये दिसते. राज्यघटना हा सामूहिक अस्मितेचा आधार आहे, असे प्रतिपादन राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू यांनी केले.
त्या म्हणाले की, राज्यघटना बनवणाऱ्या समितीत देशाच्या प्रत्येक भाग आणि प्रत्येक समाजाचे प्रतिनिधित्व होते. विशेष म्हणजे राज्यघटना बनवणाऱ्या सभेत सरोजिनी नायडू, राजकुमारी अमृत कौर, सुचिता कृपलानी, हंसाबेन मेहता आणि मालती चौधरी यांसारख्या 15 असामान्य महिलाही होत्या, असे त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांनी कठोर परिश्रम करून भारताला अन्न उत्पादनात आत्मनिर्भर बनवले आहे. आपले कामगारांनी अथक परिश्रम करून आपल्या पायाभूत व उत्पादन क्षेत्रात बदल घडवले आहेत. त्यांच्या कामगिरीच्या जोरावर आज भारतीय अर्थव्यवस्था जागतिक पातळीवर प्रभाव टाकत आहे, असे मुर्मू म्हणाल्या.
भारताचा आर्थिक विकास दर वाढत आहे. गेल्या काही वर्षांत, आर्थिक वाढीचा दर सातत्याने वाढत आहे, ज्यामुळे तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत, शेतकऱ्यांना आणि कामगारांना अधिक पैसे मिळाले आहेत आणि मोठ्या संख्येने लोक गरीबीच्या रेषेतून बाहेर आले आहेत. धाडसी आणि दूरदर्शी आर्थिक सुधारणांच्या जोरावर, येणाऱ्या वर्षांत प्रगतीचा हा वेग कायम राहील, असे त्यांनी सांगितले.
डिजिटल पेमेंटच्या अनेक पर्यायांसह प्रत्यक्ष लाभ हस्तांतरण पद्धतीने समावेशन वाढले आहे. ज्यामुळे मोठ्या संख्येने लोक औपचारिक प्रणालीमध्ये सामील होऊ शकले आहेत. यामुळे प्रणालीमध्ये पारदर्शकता आली आहे, असे राष्ट्रपतींनी सांगितले.
महाकुंभ आणि इस्त्रोवर भाष्य करताना राष्ट्रपती म्हणाल्या की, आपली सांस्कृतिक वारसा अधिक सशक्त होऊ लागला आहे. प्रयागराज महाकुंभ ही त्याची एक प्रभावी अभिव्यक्ती आहे." तसेच इस्त्रोच्या अंतराळ विज्ञानातील यशाबद्दल त्यांनी सांगितले की, "आतापर्यंत, इस्त्रोने यशस्वीरित्या स्पेस डॉकिंग प्रयोग केला आहे आणि भारत आता त्या क्षेत्रात चौथा देश बनला आहे, असे त्यांनी अभिमानाने सांगितले.