'ऑपरेशन ब्लू स्टार' ही चूक होती! ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांचे वक्तव्य 
राष्ट्रीय

'ऑपरेशन ब्लू स्टार' ही चूक होती! ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांचे वक्तव्य

अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात १९८४ मध्ये लपलेल्या दहशतवाद्यांना पकडण्यासाठी राबवण्यात आलेले ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ हे चुकीचे पाऊल होते आणि त्या निर्णयाची किंमत तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींना आपले प्राण गमावून चुकवावी लागली, असे वक्तव्य काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.

Swapnil S

सिमला : अमृतसर येथील सुवर्ण मंदिरात १९८४ मध्ये लपलेल्या दहशतवाद्यांना पकडण्यासाठी राबवण्यात आलेले ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ हे चुकीचे पाऊल होते आणि त्या निर्णयाची किंमत तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींना आपले प्राण गमावून चुकवावी लागली, असे वक्तव्य काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.

चिदंबरम हे पत्रकार आणि लेखिका हरिंदर बावेजा यांच्या ‘दे विल शूट यू मॅडम : माय लाइफ थ्रू कॉन्फ्लिक्ट’ या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी बोलत होते. ते म्हणाले की, ‘दहशतवाद्यांना पकडण्याचा आणि बाहेर काढण्याचा दुसरा मार्ग उपलब्ध होता, परंतु, ‘ऑपरेशन ब्लू स्टार’ हा चुकीचा मार्ग होता. मी सहमत आहे की, इंदिरा गांधींनी या चुकीची किंमत आपल्या जीवाने चुकवली. पण ही चूक फक्त त्यांची नव्हती. ती लष्कर, गुप्तचर यंत्रणा, पोलीस आणि नागरी संरक्षण विभाग यांच्या एकत्रित निर्णयाची परिणती होती. त्यामुळे संपूर्ण दोष इंदिरा गांधींवर ठेवता येणार नाही,’ असे माजी गृहमंत्री चिदंबरम यांनी सांगितले.

‘ऑपरेशन ब्लू स्टार’ ही १ ते १० जून १९८४ दरम्यान झालेली लष्करी कारवाई होती. या मोहिमेचा उद्देश दमदमी टकसालचे नेते जर्नेलसिंग भिंद्रनवाले आणि त्यांच्या समर्थकांना अमृतसरमधील शिखांच्या पवित्र सुवर्ण मंदिरातून हटवणे हा होता. या कारवाईनंतर त्या वर्षाच्या शेवटी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींची हत्या करण्यात आली.

काँग्रेस नेतृत्व अत्यंत नाराज

माजी गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी केलेल्या ‘ऑपरेशन ब्लू स्टार’वरील वक्तव्यामुळे काँग्रेसचे शीर्ष नेतृत्व "अत्यंत नाराज" असल्याचे सूत्रांनी रविवारी सांगितले. पक्षाचे मत आहे की, वरिष्ठ नेत्यांनी सार्वजनिक वक्तव्ये करताना काळजी घ्यावी. ज्यामुळे पक्षाला लाजिरवाणी परिस्थिती निर्माण होऊ शकते. काँग्रेसकडून सर्व काही मिळवलेल्या वरिष्ठ नेत्यांनी असे वक्तव्य करताना अधिक जबाबदारीने वागले पाहिजे. वरिष्ठ नेत्यांच्या वारंवार होणाऱ्या अशा विधानांमुळे पक्षासमोर समस्या निर्माण होतात आणि हे अयोग्य आहे. या वक्तव्यामुळे संपूर्ण पक्षात अस्वस्थता आहे. कार्यकर्त्यांमध्येही प्रश्न उपस्थित होत आहेत की असे वारंवार का घडत आहे, असे सूत्रांनी सांगितले.

काँग्रेसचा खोटा दावा उघड : भाजप

माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्या वक्तव्यानंतर भाजपने काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला आहे. इतिहासाने हे नोंदवले पाहिजे की ती राष्ट्रीय गरज नव्हती, तर इंदिरा गांधींची 'राजकीय साहसातील चूक' होती, असे भाजपने म्हटले आहे. आता काँग्रेस चिदंबरम यांच्यावर कारवाई करणार आहे का? कारण त्यांनी सत्य सांगून त्यांच्या खोट्या कथानकाचा पर्दाफाश केला आहे? असा आरोप सत्ताधारी पक्षाने केला आहे.

विधिमंडळाचे आजपासून हिवाळी अधिवेशन; विरोधकांचा चहापानावर बहिष्कार; महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच विरोधी पक्षनेतेपद रिक्त

हाऊसिंग सोसायटी समितीची सदस्यसंख्या दोन-तृतीयांशपेक्षा कमी होते, तेव्हा समिती आपोआप कायदेशीर स्थान गमावते : HC

मुंबई विद्यापीठाच्या प्रश्नपत्रिकेत मराठीत विचारण्यात येणार प्रश्न; विधी शाखेच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

जपान-चीनमध्ये तणाव! चीनने जपानी लढाऊ विमानाचे रडार केले ‘लॉक’

दुचाकी वाहनांनाही पसंतीचा नोंदणी क्रमांक मिळणार; RTO कडून प्रक्रिया सुरू, एकाच क्रमांकासाठी जास्त अर्ज आल्यास लिलाव