नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा पहिला आठवडा गदारोळामुळे वाया गेला. आता ‘पहलगाम हल्ला’ व ‘ऑपरेशन सिंदूर’वर लोकसभेत सोमवारी वादळी चर्चा होणार आहे. राष्ट्रीय सुरक्षा व परराष्ट्र धोरणावरून सरकारला कोंडीत पकडण्यासाठी विरोधकांनी दंड थोपटले आहेत.
लोकसभा व राज्यसभेत चर्चेसाठी भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी व विरोधक आपले दिग्गज नेते उतरवणार आहेत.
सूत्रांनी सांगितले की, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर हे ‘ऑपरेशन सिंदूर’वर चर्चेत सहभागी होणार आहेत, तर दहशतवादाविरोधात सरकारची ठाम भूमिका मांडण्यासाठी पंतप्रधान मोदीही सहभागी होऊ शकतात.
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी व राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे, सपाचे अखिलेश यादव हे विरोधी पक्षांकडून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतील.
बिहारमध्ये मतदार यादीच्या विशेष तपासणीच्या विरोधात विरोधकांनी जोरदार मोहीम उघडल्याने पावसाळी अधिवेशनातील पहिला आठवडा फुकट गेला.
संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले की, ‘पहलगाम हल्ला’ व ‘ऑपरेशन सिंदूर’वर सोमवारी लोकसभेत व मंगळवारी राज्यसभेत चर्चा करायला विरोधकांनी तयारी दर्शवली आहे. प्रत्येक सभागृहात १६ तासांची वादळी चर्चा अपेक्षित आहे.
या चर्चेत अनुराग ठाकूर, सुधांशू त्रिवेदी व निशिकांत दुबे, शिवसेनेतर्फे श्रीकांत शिंदे, जदयूतर्फे संजय झा व तेलगू देसमचे हरिश बालयोगी हेही सहभागी होण्याची शक्यता आहे. भारतातर्फे परदेशात गेलेल्या शिष्टमंडळात काँग्रेसचे नेते शशी थरूर यांना पक्षातर्फे चर्चेत सहभागी होण्याची संधी देण्यात येते का? हा मोठा प्रश्न आहे.
२२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यामागील गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी, भारत आणि पाकिस्तानमधील युद्धविरामासाठी मध्यस्थी केल्याच्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यांवर विरोधी पक्षांनी सरकारवर याआधीच जाहीर टीका केली आहे,
तर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सरकारच्या परराष्ट्र धोरणावर जोरदार टीका केली आहे. कारण ‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळी भारताला कोणत्याही देशाने पाठिंबा दिला नाही. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सातत्याने भारत-पाकिस्तानात मीच मध्यस्थी केल्याचा दावा करत आहेत.