राष्ट्रीय

‘ऑपरेशन सिंदूर’वरून संसदेत गदारोळ; पुढील आठवड्यात लोकसभेत १६ तास, तर राज्यसभेत ९ तास चर्चा होणार

पहलगाममध्ये करण्यात आलेला दहशतवादी हल्ला आणि त्यानंतरचे ‘ऑपरेशन सिंदूर’ तसेच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेला दावा यावरून संसदेच्या दोन्ही सभागृहांत सोमवारी पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी जोरदार गदारोळ माजला.

Swapnil S

नवी दिल्ली : पहलगाममध्ये करण्यात आलेला दहशतवादी हल्ला आणि त्यानंतरचे ‘ऑपरेशन सिंदूर’ तसेच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेला दावा यावरून संसदेच्या दोन्ही सभागृहांत सोमवारी पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी जोरदार गदारोळ माजला. विरोधकांनी या मुद्द्यांवर तातडीने चर्चा घेण्याची आग्रही मागणी केली. त्यामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज अनेकदा तहकूब करावे लागले. त्यानंतर ‘ऑपरेशन सिंदूर’सह अन्य महत्त्वाच्या मुद्द्यांवर सरकारने चर्चेची तयारी दर्शविली आणि त्यासाठी पुढील आठवड्यात लोकसभेत १६ तास, तर राज्यसभेत ९ तास अशी एकूण २५ तासांची वेळ निश्चित करण्यात आली.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी विरोधी सदस्यांच्या गदारोळामुळे लोकसभेसह राज्यसभेचे कामकाजही व्यवस्थित सुरू होऊ शकले नाही. आयकर विधेयक २०२५ वरील निवड समितीचा अहवाल लोकसभेत सादर करण्यात आला, तर राज्यसभेत बिल ऑफ लॅडिंग बिल, २०२५ सोमवारी मंजूर करण्यात आले.

पुढील आठवड्यात संसदेत ऑपरेशन सिंदूरवर चर्चा होईल. लोकसभेत ऑपरेशन सिंदूरवर १६ तास, तर राज्यसभेत ९ तास चर्चा होणार आहे. याशिवाय, लोकसभेत आयकर विधेयक २०२५ वर १२ तास, तर इंडियन पोस्ट विधेयकावर ३ तास चर्चा होणार आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रीय क्रीडा विधेयकावर ८ तास आणि मणिपूर बजेटवर २ तास चर्चा होणार आहे. दरम्यान, टीडीपी आणीबाणीवर चर्चेची मागणी करत आहे.

विरोधकांचा आवाज दडपला जातो - राहुल

काँग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी थेट केंद्र सरकारवर आरोप केला की, सत्ताधारी भाजपकडून केवळ आपल्या मंत्र्यांनाच बोलण्याची संधी दिली जाते, तर विरोधकांचा आवाज दडपला जातो. मी विरोधी पक्षनेता आहे, मला बोलण्याचा अधिकार आहे. पण मला बोलू दिले जात नाही. संरक्षण मंत्र्यांना संधी दिली जाते, पण आम्हाला नाही, असे राहुल गांधी यांनी माध्यम प्रतिनिधींना सांगितले. पंतप्रधान मोदी तर एका सेकंदात सभागृहातून बाहेर पडतात ही नवी पद्धत आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

राज्यसभेत खर्गेंचा हल्लाबोल

राज्यसभेत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सरकारवर टीकेची झोड उठवली. ते म्हणाले की, पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी अजूनही फरार आहेत, त्यांना पकडण्यात आले नाही किंवा ते मारलेही गेले नाहीत. जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल यांनीही कबूल केले आहे की, हे इंटेलिजन्स फेल्युअर होते. अशा संवेदनशील घटनेवर सरकारने खुलासा करावा. ‘ऑपरेशन सिंदूर’च्या वेळी सर्वच पक्षांनी सरकारला पाठिंबा दिला होता. मग आता आम्ही उत्तर मागितल्यावर शांतता का, असा सवाल खर्गे यांनी केला.

नवी मुंबई विमानतळावर प्रवासी चाचणी यशस्वी; २५ डिसेंबरपासून उड्डाणांना हिरवा कंदील

राज्यात २० जिल्ह्यांतील नगर परिषद निवडणुका पुढे ढकलल्या; नव्याने अर्ज दाखल करण्याची मुभा, सुधारित कार्यक्रमानुसार २० डिसेंबरला मतदान

संसदेचे हिवाळी अधिवेशन वादळी ठरणार; ‘एसआयआर’वरील चर्चेवर विरोधक ठाम

RBI मोठा निर्णय घेणार! पतधोरणात व्याजदरात कपात करणार?

आंध्रात ‘दितवाह’ चक्रीवादळामुळे जोरदार पावसाची शक्यता; हवामान खात्याचा इशारा