नवी दिल्ली : दिल्ली दंगलप्रकरणी विविध आरोप होत असताना गृहमंत्री अमित शहा यांच्या संसदेतील अनुपस्थितीवरून विरोधकांनी काहूर माजवले आहे. भाजपने यावर पलटवार केला असून राहुल गांधी यांनी खोटे आरोप केल्याबद्दल माफी मागावी, अशी मागणी केली आहे.
विरोधी पक्षांची संसदेबाहेर निदर्शने
संसदेच्या आवारात गुरुवारी विरोधी पक्षांच्या खासदारांनी विद्यार्थ्यांवरील कथित पोलीस अत्याचार आणि अयोध्येतील राम मंदिरातील देणगी चोरीच्या मुद्द्यावरून जोरदार निदर्शने केली. काँग्रेस खासदार प्रियंका गांधी-वढेरा यांच्यासह विरोधी बाकांवरील अनेक प्रमुख नेत्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला. संसदेच्या 'मकर द्वार' समोर एकत्र येत विरोधी खासदारांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. 'चढावा चोर, गद्दी चोर', 'गृहमंत्री सभागृहात या' आणि 'ऑर्डर कोणी दिली, अशा घोषणांनी संसद परिसर दणाणून गेला. या वेळी खासदारांनी एक देणगी पेटी सोबत ठेवली होती; राम मंदिरातील देणगी चोरीच्या कथित प्रकाराचा निषेध नोंदवण्यासाठी खासदार त्या पेटीत पैसे टाकताना दिसले.
या निदर्शनांमध्ये प्रियंका गांधी यांच्या व्यतिरिक्त काँग्रेस सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, समाजवादी पक्षाचे धर्मेंद्र यादव, तृणमूल काँग्रेसच्या सागरिका घोष आणि झामुमोच्या महुआ माझी यांच्यासह अनेक खासदार सहभागी झाले होते.
अपराधाच्या जाणिवेनेच शहा अनुपस्थित-राहुल
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची संसदेतील अनुपस्थिती ‘अपराधाची जाणीव’ दर्शवणारी आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी केला. तसेच, विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित पोलीस अत्याचारांची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करण्याची आपली मागणी त्यांनी पुन्हा एकदा लावून धरली.
राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोलिसांकडून विद्यार्थ्यांवर करण्यात आलेल्या लाठीमाराचा एक व्हिडिओ शेअर केला. विद्यार्थ्यांवर झालेल्या अत्याचारांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली एक स्वतंत्र उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात यावी, असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले.
भाजपचा पलटवार
दुसरीकडे, भारतीय जनता पक्षाने (भाजप) राहुल गांधींचे सर्व आरोप फेटाळून लावत पलटवार केला आहे. राहुल गांधी हे "असत्याचा मारा" करत असून संसदेत "आधारहीन" आरोप करून सभागृहाचा गैरवापर केल्याबद्दल त्यांनी माफी मागावी, अशी मागणी भाजपने केली आहे.