पुणे/बंगळुरू : पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला बुधवारी एक वर्ष पूर्ण होत आहे. या भीषण घटनेचा विसर पडणे कठीण आहे, अशी भावना या हल्ल्यातील पीडितांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे. पुण्यातील संतोष जगदाळे आणि त्यांचे मित्र कौस्तुभ गणबोटे यांच्यासह २६ हिंदू पर्यटकांना दहशतवाद्यांनी लक्ष्य केले होते. या घटनेच्या कटू आठवणी आजही जगदाळे आणि गणबोटे कुटुंबाला अस्वस्थ करत असून, त्या काळ्या दिवसाचा विसर पडणे अशक्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
२२ एप्रिल २०२५ रोजी पहलगाममध्ये झालेल्या या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्याच्या कटू आठवणी अद्यापही कुटुंबीयांच्या मनात घर करून आहेत.
पत्नी, मुलासमोर गोळ्या झाडून हत्या...
शिवमोग्गा येथील बांधकाम व्यावसायिक मंजुनाथ राव यांचा या हल्ल्यात मृत्यू झाला. काश्मीरच्या पहिल्याच सहलीवर गेलेल्या राव यांची त्यांच्या पत्नी पल्लवी आणि मुलासमोर दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली. या घटनेचा धक्का पल्लवी यांच्या मनातून अद्याप गेलेला नाही. आयुष्य पुढे न्यावे लागत असले, तरी या आठवणी विसरणे अशक्य असल्याचे त्यांचे चुलत भाऊ रवी किरण यांनी सांगितले.
कुटुंब अद्याप दुःखातून सावरलेले नाही...
बेंगळुरू येथील आयटी व्यावसायिक भरत भूषण हे या हल्ल्यातील दुसरे बळी ठरले. पत्नी सुजाता आणि तीन वर्षांच्या मुलासह सहलीवर असताना दहशतवाद्यांनी भूषण यांची हत्या केली होती. पतीचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच सुजाता यांनी त्यांचे ओळखपत्र सोबत घेतले आणि मुलासह घटनास्थळावरून पळ काढला होता. भूषण यांचे वडील व्ही. चन्नवीरप्पा यांनी या विषयावर बोलण्यास नकार देत कुटुंब अद्यापही मोठ्या दुःखात असल्याचे नमूद केले. या भीषण हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानातील दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यासाठी 'ऑपरेशन सिंदूर' राबवले होते.
पुण्याचे जगदाळे कुटुंब आठवणींनी गहिवरले...
आसावरी जगदाळे यांनी सांगितले की, या हल्ल्याच्या वेळी ते सर्वजण बैसारन खोऱ्यात फोटो काढण्यात मग्न होते. त्याचवेळी अचानक गोळीबार झाला आणि डोळ्यांदेखत तिचे वडील संतोष आणि त्यांचे मित्र कौस्तुभयांची हत्या झाली. या घटनेमुळे आसावरी आणि तिची आई प्रगती यांना आजही मानसिक धक्का जाणवतो. फटाक्यांच्या आवाजासारख्या मोठ्या आवाजानेही त्या आजही दचकतात. या घटनेनंतर राज्य सरकारने आसावरी यांना पुणे महानगरपालिकेत (पीएमसी) प्रशासकीय अधिकारी म्हणून नोकरी दिली आहे. मात्र, ही नोकरी मिळवण्यासाठीही त्यांना मोठा संघर्ष करावा लागल्याचे तिने नमूद केले.
'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरूच - लष्कराचा इशारा
नवी दिल्ली : पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याला बुधवारी एक वर्ष पूर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कराने दहशतवादाविरोधातील आपला लढा अधिक तीव्र करण्याचा पुनरुच्चार केला आहे. 'जेव्हा मानवतेच्या मर्यादा ओलांडल्या जातात, तेव्हा प्रत्युत्तरही तितकेच निर्णायक असते', अशा शब्दांत लष्कराने आपला निर्धार व्यक्त केला आहे. पहलगाम हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त लष्कराने सोशल मीडियावर एक प्रतीकात्मक संदेश प्रसिद्ध केला आहे. यात 'भारताचा नकाशा' आणि 'काही मर्यादा कधीच ओलांडल्या जाऊ नयेत' असा संदेश देण्यात आला आहे. 'भारत कधीही विसरत नाही' अशा शब्दांत लष्कराने देशाला दिलेला शब्द पाळल्याचे नमूद केले. 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरूच असल्याचे आणि देशाची लष्करी सज्जता सदैव उच्च पातळीवर राहील, असे लष्करी नेतृत्वाने स्पष्ट केले आहे.