X | @MeghUpdates
राष्ट्रीय

काश्मिरात धरपकड सुरू; आणखी ३ दहशतवाद्यांची घरे पाडली, १४ स्थानिक दहशतवादी रडारवर, ६० ठिकाणी धाडसत्र

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने सर्व माध्यमांना राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने संरक्षण मोहिमा आणि सुरक्षा दलांच्या हालचालींचे थेट कव्हरेज दाखवण्यास मनाई केली आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या हितासाठी, सर्व मीडिया प्लॅटफॉर्म, वृत्तसंस्था आणि सोशल मीडिया युजर्सना संरक्षण आणि इतर सुरक्षा-संबंधित कामकाजाशी संबंधित बाबींवर थेट वृत्तांकन करताना अत्यंत जबाबदारीने वागण्याचा आणि...

Swapnil S

श्रीनगर : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर लष्कराकडून जोरदार शोधमोहीम राबवण्यात येत असून ६० हून अधिक ठिकाणी धाडसत्र सुरू करण्यात आले आहे. दहशतवादी आणि दहशतवाद्यांना सहकार्य केल्याच्या संशयावरून जवळपास १७५ जणांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात येत आहे. खोऱ्यातील जवळपास १४ दहशतवादी तपास यंत्रणांच्या रडारवर असून आणखी तीन दहशतवाद्यांची घरे पाडण्यात आली आहेत.

पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये लष्कर, सीआरपीएफ आणि इतर सुरक्षा दलांनी धडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. सुरक्षा दलांकडून अत्यंत सतर्कता बाळगून शोधमोहीम राबवली जात आहे. याच मोहिमेंतर्गत अनंतनाग जिल्ह्यातील विविध भागात धाडी टाकल्या असून, दहशतवादी कारवाया आणि दहशतवाद्यांना सहकार्य केल्याच्या संशयावरून आतापर्यंत सुमारे १७५ जणांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात येत आहे.

जम्मू-काश्मीर पोलिसांच्या प्रवक्त्याने सांगितले की, श्रीनगरमध्ये ६० ठिकाणी छापेमारी करण्यात आली. दहशतवाद्यांची पाळेमुळे खणून काढली जात आहेत.

काश्मीरमधील सुरक्षा व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी, संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी आणि सार्वजनिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी संवेदनशील जिल्ह्यांमध्ये अतिरिक्त फिरत्या चौक्या स्थापन केल्या आहेत. जनतेला सहकार्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच नागरिकांना त्यांनी कुठल्याही संशयास्पद हालचालींची सूचना जवळच्या पोलीस ठाण्यात द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

१४ स्थानिक दहशतवादी रडारवर

श्रीनगर: पाकिस्तानच्या दहशतवाद्यांचे मदतनीस म्हणून काम करून त्यांना पाठिंबा देत रसद पुरविणाऱ्या जम्मू-काश्मीरमधील १४ स्थानिक दहशतवाद्यांची यादी गुप्तचर यंत्रणांनी तयार केली आहे. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केल्यानंतर ही यादी तयार केली. हे स्थानिक दहशतवादी पाकिस्तानी दहशतवाद्यांचे कट्टर समर्थक आहेत. ते दहशतवाद्यांना आश्रय आणि साधन सामग्री पुरवतात.

दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून केली जमीनदोस्त

शनिवारी आणखी तीन दहशतवाद्यांची घरे स्फोटकांच्या मदतीने पाडण्यात आली आहेत. कुलगाममधील झाकीर अहमद गनी आणि शोपियाँ जिल्ह्यातील छोटीपोरा येथील लष्कर-ए-तोयबाचा कमांडर शाहीद अहमद कुट्टे यांची घरे स्फोटकांच्या मदतीने पाडण्यात आली आहेत.

गुप्तचर यंत्रणांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठोकेरने २०१८ साली अटारी-वाघा सीमेतून पाकिस्तानमध्ये कायदेशीर प्रवेश मिळविला होता. मागच्या वर्षी तो लपून-छपून जम्मू-काश्मीरमध्ये परतला. पाकिस्तानमध्ये त्याने दहशतवादाचे प्रशिक्षण घेतल्याचे सांगितले जात आहे. पहलगाम हल्ल्यात सामील असलेल्या दहशतवाद्यांना मार्गदर्शन आणि सहकार्य केल्याचा त्याच्यावर संशय आहे.

शोपियान, कुलगाम आणि पुलवामा जिल्ह्यात ही कारवाई करण्यात आली. शोपियानमधील छोटीपोरा गावात लष्कर कमांडर शाहीद अहमद कुट्टे यांचे घर जमीनदोस्त केले. कुट्टे गेल्या ३-४ वर्षांपासून दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय होता. कुलगामच्या मतलाम भागात सक्रिय दहशतवादी जाहीद अहमदचे घरही पाडले.

पुलवामा येथील मुर्रन भागात दहशतवादी अहसान उल हकचे घर उडवले. अहसानने २०१८ मध्ये पाकिस्तानमध्ये दहशतवादी प्रशिक्षण घेतले होते आणि अलीकडेच तो खोऱ्यात पुन्हा दिसला होता. याशिवाय, 'लष्कर-ए-तोयबा'चा दहशतवादी अहसान अहमद शेख याचे दुमजली घरही जमीनदोस्त करण्यात आले आहे. हरिस अहमद यांचे घरही उडवून देण्यात आले आहे. तो २०२३ पासून दहशतवादात सहभागी आहे.

सैफुल्लाचाही व्हिडीओ

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर लष्कर-ए-तोयबाचा उपकमांडर सैफुल्लाह कसुरीने एक व्हिडीओ शेअर केला होता. व्हिडीओमध्ये बोलताना, त्याने पहलगाम दहशतवादी हल्ल्यात कोणताही सहभाग असल्याचे नाकारले, परंतु गुप्तचर सूत्रांनी उघड केले आहे, की सैफुल्लाहनेच लष्कर आणि जैशच्या टॉप-५ कमांडरना दहशतवादी हल्ला करण्याचे आदेश दिले होते.

फेब्रुवारी २०२५ मध्ये दहशतवादी हल्ल्याची योजना आखली होती. हल्ल्याची तारीख २२ एप्रिल निश्चित केली. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील कसुरी गावात, सैफुल्लाहने पाच कमांडरना आदेश दिले आणि नंतर ते पाकव्याप्त काश्मीरमध्ये आले. पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला करण्याची योजना आखली. या हल्ल्यात दोन काश्मिरी तरुणांनी त्याला साथ दिली.

पहलगाम हल्ल्याशी पाकचा थेट संबंध

पहलगाम दहशतवादी हल्लाच्या हल्लेखोरांशी पाकिस्तानचा थेट संबंध असल्याचे पुरावे सापडल्याचे भारताने आंतरराष्ट्रीय समुदायाला कळवले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १३ जागतिक नेत्यांशी दूरध्वनीवरून केलेली चर्चा, दिल्लीतील ३० हून अधिक राजदूत, परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री आणि परराष्ट्र मंत्रालयातील इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतलेल्या बैठकींमधून पुरावे समोर आले आहेत.

सोशल मीडिया हँडल हॅक

लष्कर-ए-तोयबाशी संलग्न असलेल्या 'टीआरएफ' दहशतवादी संघटनेने निवेदनात म्हटले की, टीआरएफने बैसरन पहलगाम दहशतवादी हल्ल्यात आपला सहभाग

नाकारला आहे. टीआरएफने आपल्या आधीच्या विधानापासून यू-टर्न घेत म्हटले आहे की, हल्ल्यानंतर लगेचच कोणीतरी त्यांचे सोशल मीडिया हँडल हॅक केले आणि पहलगाममध्ये भारतीय पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाल्याचा दावा करणारी पोस्ट शेअर केली.

लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका!

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने सर्व माध्यमांना राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने संरक्षण मोहिमा आणि सुरक्षा दलांच्या हालचालींचे थेट कव्हरेज दाखवण्यास मनाई केली आहे. गुप्तचर संस्थांनी जारी केलेल्या अलर्टनुसार, लोकांना लष्कर-ए-तोयबाच्या धोकादायक मॉड्युलबद्दल सावधगिरी बाळगण्यास सांगण्यात आले आहे. अशातच माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने माध्यमांना सुरक्षा दलांच्या हालचालींचे थेट कव्हरेज करू नका, असे आदेश दिले आहेत.

जबाबदारीने वागण्याच्या सूचना

राष्ट्रीय सुरक्षेच्या हितासाठी, सर्व मीडिया प्लॅटफॉर्म, वृत्तसंस्था आणि सोशल मीडिया युजर्सना संरक्षण आणि इतर सुरक्षा-संबंधित कामकाजाशी संबंधित बाबींवर थेट वृत्तांकन करताना अत्यंत जबाबदारीने वागण्याचा आणि कायदे आणि नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचा सल्ला दिला आहे. संरक्षण कारवाया किंवा हालचालींशी संबंधित सोर्सच्या आधारावर आलेल्या माहितीवर कोणतेही रिअल टाइम कव्हरेज, दृश्यांचे प्रसारण करू नये. संवेदनशील व माहितीचे थेट वार्तांकन केल्याने अनवधानाने विरोधी घटकांना मदत करू शकते आणि कारवाईचा प्रभावीपणा आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षितता धोक्यात आणू शकते, असे मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.

हल्ल्याचा निषेध

संयुक्त राष्ट्र : संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने (यूएनएससी) पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा कडक शब्दांत निषेध करतानाच, या हल्ल्याच्या आयोजक आणि प्रायोजकांवर कठोर कायदेशीर कारवाई केली पाहिजे, असे म्हटले आहे. १५ देशांच्या परिषदेने 'जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्या'वर एक निवेदन जारी केले आणि सदस्यांनी २२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा कठोर शब्दांत निषेध केला. सुरक्षा परिषदेच्या सदस्यांनी या निंदनीय दहशतवादाच्या कृत्याचे गुन्हेगार, आयोजक, वित्तपुरवठादार आणि प्रायोजकांना जबाबदार धरण्याची आणि त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाईची गरज निवेदनात अधोरेखित केली.

तटस्थ चौकशीला तयार : शाहबाज शरीफ

इस्लामाबाद: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने आक्रमक भूमिका घेतल्याने बिथरलेल्या पाकिस्तानने आता तटस्थ आणि पारदर्शक चौकशीला सामोरे जाण्याची तयारी दर्शविली आहे. तांत्रिक बुद्धिमत्ता आणि विश्वसनीय माहितीच्या आधारावरून हल्ला पाकिस्ताननेच केल्याचा दावा भारताने केल्यानंतर आता पाकिस्तानचे धाबे दणाणले असून त्यांनी तटस्थ आणि पारदर्शक चौकशीची तयारी दर्शविली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी या हल्ल्याप्रकरणी तटस्थ चौकशीची तयारी दर्शविली आहे.

'हे' दहशतवादी निशाण्यावर

आदिल रहमान देंतू : लष्कर-ए-तोयबाचा सोपोर कमांडर. तपास यंत्रणांच्या रडारवर आहे. त्याला मारण्याची किंवा त्याचे घर उद्ध्वस्त करण्याची योजना.

आसिफ अहमद शेख : जैश-ए-मोहम्मदचा अवंतीपुरा जिल्हा कमांडर. २०२२ पासून दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय.

एहसान अहमद शेख : पुलवामामध्ये सक्रिय लष्कर दहशतवादी. २०२३ पासून दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी.

हरीश नजीर : पुलवामातील सक्रिय लष्कर दहशतवादी. सुरक्षा दलांच्या रडारवर.

आमिर नाजिर वानी : पुलवामातील सक्रिय लष्कर- ए-तोयबा दहशतवादी.

यावर अहमद भट्ट : पुलवामामध्ये सक्रिय जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी.

असिफ अहमद कंडे : शोपियामधील हिजबुल मुजाहिद्दीनचा सक्रिय दहशतवादी. पाकिस्तानी

दहशतवाद्यांना मदत करतो.

नसीर अहमद वानी : शोपियामधील लष्करचा सक्रिय दहशतवादी. परकीय दहशतवाद्यांना मदत करतो.

शाहीद अहमद कुट्टे : शोपियामधील लष्कर आणि टीआरएफचा मोठा दहशतवादी. २०२३ पासून सक्रिय.

आमिर अहमद दार : शोपियामधील लष्कर व टीआरएफसोबत सक्रिय. विदेशी दहशतवाद्यांचा मदतनीस.

अदनान सफी दार : शोपियामधील सक्रिय दहशतवादी. लष्कर आणि टीआरएफसोबत काम करतो. पाक हँडलर्सची माहिती पोहोचवतो.

जुबेर अहमद वानी : हिजबुलचा अनंतनाग ऑपरेशनल कमांडर. २०१८ पासून सक्रिय. सुरक्षा दलांवर हल्ल्यांमध्ये सहभागी.

हारून रशीद गनी : अनंतनागमधील हिजबुलचा सक्रिय दहशतवादी. पाकव्याप्त काश्मीरमध्ये प्रशिक्षण घेतले.

जुबेर अहमद गनी : कुलगाममधील मोठा लष्कर दहशतवादी. सुरक्षा दलांवर हल्ले व टार्गेट किलिंगमध्ये सक्रिय.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत