बंगळुरू: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने राबविलेल्या ऑपरेशन सिंदूरदरम्यान किती विमाने पाडण्यात आली त्याबाबत परदेशातूनही दावे केले जात असतानाच भारताच्या हवाई दल प्रमुखांनी याबाबत शनिवारी गौप्यस्फोट केला. भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने आणि हवाई दखरेखीसाठी असलेले एक मोठे विमान पाडल्याचा दावा हवाई दल प्रमुख ए. पी. सिंग यांनी शनिवारी येथे केला.
पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्यदलांनी केलेल्या ऑपरेशन सिंदूरला आता तीन महिने लोटत आहेत. या तीन महिन्यांमध्ये ऑपरेशन सिंदूरबाबत वेगवेगळे दावे आणि अनेक आरोप-प्रत्यारोप झाले आहेत. ऑपरेशन सिंदूरदरम्यान, भारतीय हवाई दलाच्या एअर डिफेन्स सरफेस टू एअर मिसाईल सिस्टिमने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने आणि एक अवाक्स विमान पाडले, अशी माहिती सिंग यांनी बंगळुरूमध्ये आयोजित एअरचिफ मार्शल एल. एम. कात्रे व्याख्यानमालेदरम्यान दिली. एस-४०० गेमचेंजर भारताच्या एस-४०० एअर डिफेन्स सिस्टिमने पाकिस्तानच्या या विमानांना पाडले. त्यामध्ये एईडब्ल्यू अँड सी विमानाला तब्बल ३०० किलोमीटर अंतरावरून लक्ष्य करण्यात आले, अशी माहिती हवाई दलप्रमुखांनी दिली. ऑपरेशन सिंदूरदरम्यान, पाकिस्तानला झालेल्या नुकसानाबाबत भारतीय हवाई दलाने पहिल्यांदाच अधिकृतरीत्या माहिती देण्याची ही पहिलीच वेळ आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने पाच पाकिस्तानी विमाने पाडली, ३०० किमी अंतरावरून केलेल्या हल्ल्याचा विक्रम, एस-४०० क्षेपणास्त्र गेमचेंजर ठरले आणि त्यानंतर मोठे नुकसान टाळण्यासाठी पाकिस्तानने युद्धबंदीची विनंती केली, असे सिंग यांच्या भाषणातील काही प्रमुख मुद्दे होते.
यूएव्ही, ड्रोनही नष्ट विमानांव्यतिरिक्त आपण मोठ्या संख्येने यूएव्ही आणि ड्रोन्सही नष्ट केले. त्यांची काही क्षेपणास्त्रे आपल्या हद्दीत पडली होती. आम्ही त्याचे अवशेष गोळा केले आहेत. या अवशेषांचा अभ्यास सुरू आहे. जेणेकरून ती कुठून सोडण्यात आली, त्यांनी कोणता मार्ग अवलंबला होता. क्षेपणास्त्र सोडणारी प्रणाली कशी आहे आणि त्याची क्षमता किती आहे, याची माहिती आम्हाला मिळू शकेल, असेही ए. पी. सिंग यांनी सांगितले.
ऑपरेशन सिंदूर का आणि कोणाच्या दबावाखाली थांबविले - काँग्रेसचा मोदी यांना सवाल
नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० मे रोजी ऑपरेशन सिंदूर का आणि कोणाच्या दबावाखाली थांबविले, असा सवाल काँग्रेसने शनिवारी केला. पाकिस्तानची एकूण सहा विमाने पाडल्याचा दावा शनिवारी हवाई दलप्रमुखांनी केला. त्यानंतर काँग्रेसने मोदी यांना सवाल विचारला आहे.
हवाई दलप्रमुखांनी जो गौप्यस्फोट केला त्या पार्श्वभूमीवर मोदी यांनी १० मे रोजी ऑपरेशन सिंदूर का थांबविले ही बाब अधिक धक्कादायक आहे, असे काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी एक्सवर म्हटले आहे. मोदी यांच्यावर कोणाकडून दबाव आला आणि ते तातडीने शरण का गेले, असा सवाल रमेश यांनी केला आहे.
नंतर युद्धबंदी
हवाई दल प्रमुख म्हणाले की, ऑपरेशन सिंदूर हे एक हायटेक युद्ध होते. पहिल्या ८० ते ९० तासांत आम्ही पाकिस्तानचे प्रचंड नुकसान केले आहे. त्यांच्या बहुतांश तळांना लक्ष्य करण्यात आले होते. त्यामुळे पाकिस्तानी लोकांना समजले होते की, जर हे युद्ध असेच सुरू राहिले तर त्यांना खूप मोठी किंमत मोजावी लागेल. म्हणूनच त्यांनी पुढाकार घेतला. पाकिस्तानी डीजीएमओने भारताच्या डीजीएमओला फोन केला. नंतर युद्धबंदी झाली.
भारत-पाक युद्ध मीच थांबविले; अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांचा पुन्हा दावा
न्यूयॉर्क/वॉशिंग्टन : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्ध आपणच थांबविल्याचा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा केला आहे. अन्यथा दोन्ही देशांमधील लष्करी संघर्ष कदाचित अणुसंघर्षापर्यंत पोहोचला असता, असेही ते म्हणाले. या संघर्षात पाच ते सहा विमाने पाडण्यात आल्याचा दावाही ट्रम्प यांनी व्हाइट हाऊसमध्ये बोलताना केला. कोणत्या देशाची विमाने पाडण्यात आली ते ट्रम्प यांनी स्पष्ट केले नाही अथवा दोन्ही देशांची मिळून पाच-सहा विमाने पाडण्यात आली तेही त्यांनी स्पष्ट केलेले नाही. अझरबैजानचे अध्यक्ष इल्हाम अलियेव्ह आणि आर्मेनियाचे पंतप्रधान निकोल पाशिनयान यांच्यात अमेरिकेच्या मध्यस्थीने शांतता करारावर सह्या करण्यात आल्या तेव्हा ट्रम्प यांनी या दोन्ही नेत्यांच्या उपस्थितीत भारत-पाकिस्तान युद्ध थांबविल्याचा दावा केला.
पाकिस्तानचे एकही विमान पाडले नाही : पाकचा दावा
इस्लामाबाद : भारत आणि पाकिस्तान यांच्यात अलीकडेच जोरदार संघर्ष झाला त्यावेळी भारताकडून पाकिस्तानच्या एकाही विमानाला लक्ष्य करण्यात आले नाही अथवा ते पाडण्यातही आले नाही, असा दावा पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी शनिवारी केला. गेल्या तीन महिन्यांपासून अशा प्रकारचा दावा करण्यात आला नाही, मात्र पाकिस्तानने युद्ध थांबल्यानंतर त्वरितच सर्व तांत्रिक बाबी आंतरराष्ट्रीय माध्यमांसमोर स्पष्ट केल्या, असा दावाही आसिफ यांनी केला. भारताच्या हवाई दलप्रमुखांनी जो गौप्यस्फोट केला तो अकल्पनीय आहे. कारण त्याला खूप विलंब झाला आहे, असेही ते म्हणाले.