जम्मू : पाकव्याप्त काश्मीर (पीओके) हा भारताचाच अविभाज्य भाग आहे. ‘पीओके’शिवाय जम्मू-काश्मीर अपूर्ण आहे. पीओके ही पाकिस्तानसाठी परकीय भूमी आहे आणि ते दहशतवाद पसरवण्यासाठी या भूमीचा वापर करत आहेत. ‘पीओके’मध्ये दहशतवाद्यांसाठी प्रशिक्षण शिबिरे चालवली जात आहेत, अशा शब्दात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला सुनावले.
जम्मू-काश्मीरमधील अखनूर येथे मंगळवारी झालेल्या नवव्या सशस्त्र सेना वेटरन्स डे कार्यक्रमात राजनाथ सिंह म्हणाले की, “१९६५मध्ये अखनूर भागात भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध झाले होते. पाकिस्तानी लष्कराचे सर्व प्रयत्न भारताने हाणून पाडले होते. आत्तापर्यंत भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या सर्व युद्धांमध्ये भारताने पाकिस्तानचा पराभव केला आहे. १९६५ पासून पाकिस्तानने भारतात अवैध घुसखोरी आणि दहशतवादाला प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली होती. आजही भारतात घुसणारे ८० टक्क्यांपेक्षा जास्त दहशतवादी पाकिस्तानातून येतात.”