रायपूर : छत्तीसगडच्या प्रसिद्ध 'पंडवानी' लोककला जागतिक स्तरावर पोहचवणाऱ्या ज्येष्ठ लोकगायिका डॉ. तीजन बाई (वय ७०) यांचे रविवारी निधन झाले. त्या गेल्या काही दिवसांपासून दीर्घ आजाराने त्रस्त होत्या.
'पंडवानी' म्हणजे 'पांडवांची वाणी'. ही महाभारतातील कथांवर आधारित एक लोककला आहे. आपल्या हातातील तंबोऱ्यासारख्या वाद्याच्या साह्याने कथा सांगण्याच्या कलेचे रूपांतर त्यांनी थेट नाट्यात केले होते. त्यांचा भारदस्त आवाज, हावभाव आणि उपस्थितीमुळे महाभारतातील प्रत्येक पात्र जिवंत होत असे. दुर्ग जिल्ह्यातील गनियारी गावातील एका गरीब आदिवासी कुटुंबातून येऊन जगातील सर्वात मोठ्या सांस्कृतिक व्यासपीठांपर्यंत पोहोचलेला त्यांचा प्रवास हा विलक्षण जिद्द, बंडखोरी आणि कलात्मकतेचा एक अनोखा नमुना आहे.
१९५६ मध्ये पारधी जमातीत जन्मलेल्या तीजन बाई यांनी आपले आजोबा बृजलाल यांच्याकडून महाभारताचे भाग ऐकत मोठेपण अनुभवले. त्यांच्याकडून प्रेरित होऊन त्यांनी संपूर्ण महाभारत तोंडपाठ केले होते. प्रसिद्ध नाट्यकर्मी हबीब तनवीर यांनी त्यांच्यातील कला ओळखली आणि त्यांना तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासमोर सादरीकरण करण्याची संधी मिळवून दिली. या कार्यक्रमाने त्यांचे आयुष्य बदलले. १९८६ मध्ये त्या भिलाई स्टील प्लांटमध्ये रुजू झाल्या. त्यांनी भारत सरकारच्या सांस्कृतिक राजदूत म्हणून अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, स्वित्झर्लंड, इटली, जपान, रशिया, ऑस्ट्रेलिया अशा अनेक देशांत सादरीकरण केले.
त्यांचे 'द्रौपदी चीरहरण' हे सादरीकरण खूप गाजले, ज्यातून त्यांनी महिलांवरील हिंसाचाराबद्दल समाजात जनजागृती केली.. त्यांना पद्मश्री (१९८७), पद्मभूषण (२००३) आणि पद्मविभूषण (२०१९) यांसारख्या सर्वोच्च नागरी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. यांनी 'पीटीआय'ला सांगितले. त्यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी व अनेक नामांकितांनी शोक व्यक्त केला आहे.
संस्कृत महाभारत तोंडपाठ
सुरुवातीला त्यांच्या आजोबांनी त्यांना गनियारी गावात छोटासा मंच मिळवून दिला. नंतर, चंद्राखुरी येथील देशमुख कुटुंबाने त्यांना गावातील चौकात सादरीकरणासाठी बोलावले. त्यांचे कार्यक्रम इतके लोकप्रिय झाले की, आसपासच्या गावांतून गर्दी लोटल्यामुळे त्यांना तिथे तीन आठवडे राहावे लागले. औपचारिक शिक्षण नसतानाही, त्यांनी संस्कृत महाभारतातील सर्व १८ पर्व केवळ २१ दिवसांत तोंडपाठ केले होते.
बंडखोर कलाकार
अगदी लहान वयातच त्यांचा विवाह झाला होता. पण १२ व्या वर्षी गौना (सासरी पाठवण्याची प्रथा) समारंभाच्या वेळी सासरच्या लोकांनी त्यांना गायन थांबवण्यास सांगितले असता, त्यांनी ठाम नकार दिला. या बंडखोरीमुळे त्यांचा संसार मोडला, त्यांना समाजात बहिष्कृत करण्यात आले आणि घराबाहेर काढले गेले. एका झोपडीत एकट्या राहून, शेजाऱ्यांच्या | मदतीने त्यांनी दिवस काढले, पण त्यांनी आपली पंडवानी कला सोडली नाही.