राष्ट्रीय

जपानच्या पर्यावरण अभ्यासकांना उद्यान आणि प्राणी संग्रहालयाची भुरळ: जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबवणार; गोटो मासरू यांचे प्रतिपादन

Swapnil S

मुंबई : जपान येथील योकोहामा शहराचे आंतरराष्ट्रीय संपर्क विभागाचे आशिया खंड संचालक गोटो मासरू यांनी शुक्रवारी भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालयाला भेट दिली. उद्यानातील मियावाकी विभागातील वृक्षवल्लीविषयक माहिती मासरू यांनी यावेळी जाणून घेतली. उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी त्यांना उद्यानाची आणि प्राणी संग्रहालयाची माहिती दिली.

भारतातील मुंबई आणि जपानमधील योकाहामा ही दोन्ही शहरे सन १९६५ मध्ये भगिनी शहर संबंध (सिस्टर सिटी) या उपक्रम अंतर्गत जोडली गेली आहेत. या उपक्रमाला पुढील वर्षी ६० वर्षे पूर्ण होत आहेत. त्याअनुषंगाने जपानकडून या भेटीचे आयोजन करण्यात आले. तसेच येत्या वर्षभरात पर्यावरण जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे मासरू यांनी सांगितले. यावेळी त्यांनी उद्यान आणि प्राणी संग्रहालयातील विविध ठिकाणी भेट दिली.

गतवर्षी ५ जून २०२३ या जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने जपानचे राजदूत फुकहोरी यसुकता आणि मलेशियाचे राजदूत अहमद झुवेरी युसूफ यांनी वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणी संग्रहालयात प्रातिनिधिक स्वरूपात झाडांची लागवड केली. तसेच मुंबईतील पर्यावरणाच्या अनुषंगाने हाती घेण्यात आलेल्या पुढाकारांना त्यांनी पाठिंबा दर्शवला. त्यावेळी लागवड केलेल्या रोपांच्या ठिकाणी मासरू यांनी भेट दिली.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस