नवी दिल्ली : भविष्य निर्वाह निधी संघटने (ईपीएफओ)च्या सेवानिवृत्त सदस्यांना पीएफची रक्कम नियमित हप्त्यांमध्ये मिळण्याची सुविधा देण्याबरोबरच खात्यात ठेवावी लागणारी किमान शिलकीची मर्यादा २५ टक्क्यांवरून १० टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आली आहे. तसेच, पीएफची अंतिम रक्कम काढण्यासाठीचा प्रतीक्षा कालावधी १२ महिन्यांवरून दोन महिन्यांवर आणण्यात आला आहे.
ईपीएफओने गुरुवारी पीएफ काढण्याच्या नियमांमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले. केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या (सीबीटी) २४०व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर यासंदर्भात अधिकृत निवेदन जारी करण्यात आले. पहिल्या टप्प्यात ५५ वर्षांपेक्षा अधिक वयाचे आणि भविष्य निर्वाह निधीत ५ लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम जमा असलेले सुमारे सहा लाख ३२ हजार ईपीएफ सदस्य या सुविधेचे प्रमुख लाभार्थी ठरतील, अशी अपेक्षा कामगार मंत्रालयाने व्यक्त केली आहे.
ईपीएफओच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाने युनिव्हर्सल अकाऊंट नंबर (यूएएन) शी जोडलेल्या ऐच्छिक योगदान आणि तृतीय पक्षांकडून सूक्ष्म योगदान स्वीकारण्याच्या यंत्रणेलाही मंजुरी दिली. यामध्ये ग्राहकांकडून मिळणाऱ्या टिप्ससारख्या योगदानाचाही समावेश असेल. ही योगदान व्यवस्था पारंपरिक नियोक्ता-वेतन प्रणालीपासून स्वतंत्रपणे काम करील.
ठेव-संलग्न विमा योजना
कर्मचारी ठेव-संलग्न विमा योजना (इडीएलआय) २०२६ मध्ये दुरुस्त्यांना मंजुरी दिली. जुन्या प्रलंबित विमा सवलतीच्या प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी आणि नवीन व्यवस्थेकडे जाताना आस्थापनांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी या दुरुस्त्या करण्यात येणार आहेत.
३ टक्क्यांपर्यंत गुंतवणूक
इपीएफओला नवीन जमा होणाऱ्या निधीपैकी ३ टक्क्यांपर्यंत पात्र पर्यायी गुंतवणूक निधी (एआयएफ) मध्ये गुंतवणूक करण्यास तत्त्वतः मंजुरी देण्यात आली. ही गुंतवणूक विद्यमान एकूण गुंतवणूक मर्यादेच्या आत राहणार आहे. सुरुवातीला ही गुंतवणूक सरकारच्या पाठबळ असलेल्या संस्थांमार्फत केली जाणार आहे.
खात्यातील किमान शिल्लक २५ वरून १० टक्क्यांवर
सदस्यांच्या अधिक आर्थिक सुलभतेसाठी ईपीएफ खात्यात राखून ठेवावी लागणारी किमान शिल्लक रकमेची मर्यांदा २५ टक्क्यांवरून १० टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आली आहे. तसेच पीएफची अंतिम रक्कम काढण्यासाठीचा प्रतीक्षा कालावधी १२ महिन्यांवरून दोन महिन्यांवर आणण्यात आला आहे. त्याचवेळी दीर्घकालीन सामाजिक सुरक्षिततेसाठी खात्यावर किमान रक्कम राखून ठेवण्याची व्यवस्था कायम राहणार आहे.
एसडब्ल्यूपी योजनेची वैशिष्ट्ये
सिस्टिमॅटिक विथड्रॉवल प्लॅन (एसडब्ल्यूपी) अंतर्गत निवृत्त सदस्यांना पीएफची संपूर्ण रक्कम एकाच वेळी काढण्याऐवजी मासिक, त्रैमासिक किंवा सहामाही हप्त्यांमध्ये काढण्याची सुविधा मिळेल.
उर्वरित निधीवर परतावा मिळत राहणार असल्याने निवृत्त सदस्यांना नियमित उत्पन्नाचा स्रोत, बचतही कायम राहण्यास मदत.
सुविधा पूर्णपणे ऐच्छिक. सदस्याच्या निवृत्तीनंतरच्या पेन्शन उत्पन्नाला पूरक आणि आर्थिक सुरक्षितता वाढवण्याचा उद्देश.
हप्त्यांमध्ये रक्कम मिळण्याच्या कालावधीत सदस्याचा मृत्यू झाल्यास, नामनिर्देशित व्यक्ती किंवा त्याच्या वारसांना उर्वरित निधी एकरकमी काढण्याची किंवा नियमित हप्त्यांमध्ये मिळवण्याची मुभा.
ऐच्छिक योगदानाची नवी व्यवस्था
ईपीएफओ सदस्यांना स्वतःहून किंवा इतर व्यक्ती/संस्थांकडूनही पीएफ खात्यात पैसे जमा करण्याची स्वतंत्र सुविधा. ही योगदान व्यवस्था सदस्याच्या यूएएनशी जोडणार.
ही व्यवस्था कार्यान्वित झाल्यावर सदस्याला पीएफ खात्यात ऐच्छिक अतिरिक्त रक्कम जमा करता येईल.
पीएफ सदस्याच्या खात्यात अन्य व्यक्ती किंवा संस्थांकडूनही छोट्या रकमेचे योगदान जमा करता येण्याची सुविधा.
ग्राहकाने कामगाराला दिलेली टिप, डिजिटल व्यवहारातून मिळणारी छोटी रक्कम किंवा अन्य स्वरूपातील योगदान यांचा समावेश.