राष्ट्रीय

जगातील कोणत्याही नेत्याने युद्ध थांबवण्यास सांगितले नाही - पंतप्रधान मोदी

मी लोकशाहीच्या मंदिरात पुन्हा स्पष्ट करतो की, ‘ऑपरेशन सिंदूर’ अद्याप संपलेले नाही, पाकिस्तानने कुठलीही आगळिक केली तर त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल, असे मोदींनी पाकला ठणकावले.

Swapnil S

नवी दिल्ली : पहलगाममध्ये करण्यात आलेला दहशतवादी हल्ला आणि ‘ऑपरेशन सिंदूर’वरील वादळी चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी लोकसभेत उत्तर दिले. ‘जगातील कोणत्याही नेत्याने युद्ध थांबवण्यास सांगितले नाही’, असे स्पष्ट करून मोदी यांनी याबाबत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या दाव्याचे सपशेल खंडन केले. इतकेच नव्हे, तर जर पाकिस्तानने यापुढे हल्ला केला तर त्यापेक्षा मोठा हल्ला करून आम्ही उत्तर देऊ, गोळीचे उत्तर आम्ही तोफगोळ्याने देऊ, असे जाहीर केले.

मी लोकशाहीच्या मंदिरात पुन्हा स्पष्ट करतो की, ‘ऑपरेशन सिंदूर’ अद्याप संपलेले नाही, पाकिस्तानने कुठलीही आगळिक केली तर त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल, असे मोदींनी पाकला ठणकावले. ‘ऑपरेशन सिंदूर’ला जगभरातून पाठिंबा मिळत असताना काँग्रेस देशातील वीरांच्या पाठीशी उभा राहिला नाही, असा आरोप त्यांनी केला.

भारताने पाकिस्तानच्या ज्या हवाई तळांवर हल्ले केले ते तळ अद्यापही ‘आयसीयू’मध्ये आहेत आणि २२ एप्रिलच्या हल्ल्याच्या सूत्रधारांना निद्रानाश जडला आहे. पाकिस्तानच्या अणुशक्तीच्या धमकीला आपण खोटे ठरवून दाखवले. यापुढे‘न्यूक्लिअर ब्लॅकमेलिंग’ चालणार नाही आणि त्यामुळे भारत झुकणार नाही हेही आम्ही दाखवून दिले. पाकिस्तानच्या छाताडावर आपण अचूक प्रहार केले. पाकिस्तानचे हवाई तळ आपण उद्ध्वस्त केले. पाकिस्तानने ९ मे रोजी जवळजवळ १००० मिसाईल्स आणि ड्रोन्सच्या मदतीने भारतावर मोठा हल्ला करण्याचा प्रयत्न केला, या मिसाईल्स भारताच्या कोणत्याही भागावर पडल्या असत्या तर तिथे मोठा विध्वंस झाला असता. पण या १००० मिसाईल्स आणि ड्रोन्सना भारताच्या ‘एअर डिफेन्स सिस्टिम’ने आकाशातच हाणून पाडले, असेही मोदी म्हणाले.

स्वातंत्र्यानंतरच्या निर्णयांची शिक्षा आजही देश भोगत आहे. १९६५च्या युद्धानंतर हाजीपीर पास पुन्हा पाकिस्तानला दिले, १९७१ च्या युद्धानंतर ९३ हजार कैद्यांना सोडून दिले, हजारो वर्ग क्षेत्रावर पाणी सोडले, पाकव्याप्त काश्मीर परत घेण्याची संधीही गमावली, असे ते म्हणाले. संरक्षण क्षेत्रातील शस्त्रास्त्रांची निर्यात आमच्या काळात वाढली आहे आणि संरक्षणात आत्मनिर्भर होणे हे विश्वशांतीसाठी गरजेचे आहे, असेही ते म्हणाले.

अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांनी ९ मे रोजी रात्री माझ्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण मी फोन उचलू शकलो नाही. त्यानंतर एक तासाने मी संपर्क केला. तेव्हा त्यांनी मला सांगितले, “पाकिस्तान तुमच्यावर मोठा हल्ला करणार आहे. मी त्यांना उत्तर दिले की, जर पाकिस्तानचा हा प्रयत्न असेल तर तो त्यांना महागात पडेल. जर पाकिस्तानने हल्ला केला तर त्यापेक्षा मोठा हल्ला करुन आम्ही उत्तर देऊ. गोळीचे उत्तर आम्ही तोफगोळ्याने देऊ, असेही मी स्पष्ट केले. मी आज लोकशाहीच्या मंदिरात पुन्हा सांगतो ‘ऑपरेशन सिंदूर’ संपलेले नाही. पाकिस्तानने कुठलीही आगळिक केली तर त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल”, असे मोदींनी ठणकावले.

मोदी पुढे म्हणाले की, त्यानंतर ९ मेच्या रात्रीपासून १० मेच्या सकाळपर्यंत आम्ही जोरदार हल्ला करून पाकिस्तानची सैन्यशक्ती नष्ट केली. हेच आमचे प्रत्युत्तर होते. नऊ मे रोजी मध्यरात्रीपासून दहा मे रोजी सकाळपर्यंत आमच्या क्षेपणास्त्रांनी पाकिस्तानच्या प्रत्येक ठिकाणावर हल्ला केला. त्यामुळे अखेरीस पाकिस्तानला गुडघे टेकणे भाग पडले. जेव्हा पाकिस्तानवर तगडा प्रहार केला गेला. तेव्हा पाकिस्तानने ‘डीजीएमओं’ना फोन करून आता पुरे झाले, आता हल्ला थांबवा, अशी विनवणी केली, असे मोदींनी सांगितले. तसेच १० मे रोजी भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’अंतर्गत सुरू असलेली कारवाई थांबवण्याची घोषणा केली, तेव्हा त्याबाबत वेगवेगळ्या गोष्टी बोलल्या गेल्या. हा तोच गैरसमज होता जो सीमेपलीकडून पसरवण्यात आला होता. काही लोक लष्कराकडून सांगण्यात आलेल्या गोष्टींऐवजी पाकिस्तानच्या खोट्या प्रचाराला पुढे रेटत होते. मात्र भारताची भूमिका स्पष्ट होती, असेही ते म्हणाले.

‘ऑपरेशन सिंदूर’च्यादरम्यान संयुक्त राष्ट्र, १९३ देशांपैकी पाकिस्तानच्या बाजूने फक्त तीनच देश बोलत होते. फ्रान्स, ग्रीस, जर्मनी आणि कोणत्याही देशाचे नाव घ्या, संपूर्ण जगाने भारताला समर्थन दिले. संपूर्ण जगभरातील देशांचा भारताला पाठिंबा मिळाला. पण दुर्दैव आहे की देशाच्या जवानांच्या शौर्याला काँग्रेसचा पाठिंबा मिळाला नाही, असे पंतप्रधान म्हणाले.

२२ मिनिटांत २२ एप्रिलचा बदला

आम्हाला गर्व आहे की दहशतवाद्यांना आम्ही शिक्षा दिली. ती शिक्षा अशी होती की दहशतवाद्यांच्या म्होरक्यांची झोप उडाली आहे. पहलगाम हल्ला झाल्यानंतरच पाकिस्तानला समजले होते की, भारत काहीतरी मोठे पाऊल उचलणार आहे. ६ मे च्या रात्री आपल्या सैन्य दलांनी २२ मिनिटांत २२ एप्रिलचा बदला घेतला. पहिल्यांदा असे घडले की पाकिस्तानच्या कानाकोपऱ्यातले दहशतवादी तळ आपण उद्ध्वस्त केले. बहावलपूर, मुरिके हेही आपण जमीनदोस्त केले. पाकिस्तानच्या अणुशक्तीच्या धमकीला आपण खोटे ठरवले. ‘न्यूक्लिअर ब्लॅकमेलिंग’ यापुढे चालणार नाही हेही आम्ही दाखवून दिले, असे मोदी म्हणाले.

नेहरूंवर पुन्हा टीका

‘सिंधू जल समझोता’ नेहरूंनी करून भारताचे हित गहाण ठेवले, स्वाभिमानाला धक्का पोहोचविला, ८० टक्के पाणी पाकिस्तानला देण्यास नेहरू राजी झाले. सिंधू जल समझोता करून त्यांनी देशहित बासनात गुंडाळून ठेवले ही नेहरूंची घोडचूक होती. काँग्रेसकडे राष्ट्रीय सुरक्षेची दृष्टीच नाही, अशा शब्दांत मोदी यांनी नेहरू आणि काँग्रेसवर हल्ला चढविला. काँग्रेसने सातत्याने तुष्टीकरणाचे आणि मतपेढीचे राजकारण केले. त्यामध्ये देशाच्या सुरक्षेचा बळी दिला गेला असल्याची टीकाही त्यांनी केली.

"भगवा आणि हिंदुत्वाचा विजय"; मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात निर्दोष ठरल्यानंतर साध्वी प्रज्ञा सिंह यांना अश्रू अनावर

2008 Malegaon Blast : 'दंगलींचे शहर' बॉम्बस्फोटाने काळवंडले! मालेगावच्या इतिहासातील काळा दिवस

"भारत-रशियाने मिळून त्यांची आधीच डबघाईस आलेली अर्थव्यवस्था..."; टॅरिफच्या तडाख्यानंतर ट्रम्प यांचा थेट निशाणा

2008 Malegaon Blast : ठोस पुरावेच नाही! साध्वी प्रज्ञा, पुरोहित यांच्यासह सातही आरोपी निर्दोष, १७ वर्षांनंतर आला निकाल

अमेरिकेचा भारताला तडाखा; भारतीय ‌वस्तूंवर १ ऑगस्टपासून २५ टक्के ‘टॅरिफ’