वडेदरा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग दुसऱ्या दिवशी इंधन जपून वापरण्याचे आवाहन देशवासीयांना केले. पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा आणि मेट्रो, विजेच्या बस व सार्वजनिक वाहतुकीचा उपयोग करावा, असे ते म्हणाले. वर्क फ्रॉम होम, शाळा ऑनलाइन चालवणे आदी उपाययोजना कराव्यात. कोरोनाचा मुकाबला देशाने केला. त्याचप्रमाणे भारतीयांनी सध्याच्या संकटाचा सामना करावा. परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी आपल्या किमान ५ परदेशी पाहुण्यांना भारतात पर्यटनासाठी आणावे, असे आवाहन मोदींनी केले.
दरम्यान, ११ मे हा दिवस ऐतिहासिक असल्याचे सांगून पंतप्रधान म्हणाले, १९९८ मध्ये याच दिवशी अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली भारताने अणुचाचणी करून जगाला आपले सामर्थ्य दाखवून दिले होते. त्यावेळी जगाने भारतावर निर्बंध लादले, भारताला एकटे पाडण्याचा प्रयत्न केला आणि आर्थिक कोंडी केली. इतर कोणताही देश अशा दबावाखाली कोसळला असता, पण भारत डगमगला नाही. 'राष्ट्र प्रथम' हेच आमचे धोरण आहे.
पं. नेहरू, तुष्टीकरणावर टीका
पंतप्रधानांनी सोमनाथ मंदिराच्या इतिहासाचा संदर्भ देत विरोधकांवर निशाणा साधला. १९४७ मध्ये देश स्वतंत्र झाला असला तरी, १९५१ मधील सोमनाथ मंदिराची प्राणप्रतिष्ठा ही भारताच्या मुक्त जाणीवेची घोषणा होती. देशात आजही अशा काही 'शक्ती' सक्रिय आहेत ज्या राष्ट्रीय स्वाभिमानापेक्षा तुष्टीकरणाच्या राजकारणाला अधिक महत्त्व देतात. सरदार वल्लभभाई पटेल आणि भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र सरदार वल्लभभाई पटेल आणि डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी मंदिर उभारणीसाठी मोठे प्रयत्न केले, मात्र तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी त्याला विरोध केला होता, असे मोदींनी नमूद केले. जी मानसिकता सोमनाथच्या वेळी होती, तीच अयोध्येतील राम मंदिर निर्मितीच्या वेळीही दिसून आली. देशात अजूनही काही शक्ती राष्ट्रीय स्वाभिमानापेक्षा तुष्टीकरणाच्या राजकारणाला महत्त्व देतात, अशी टीका त्यांनी केली.
भव्य रोड शो आणि महापूजा
या कार्यक्रमापूर्वी पंतप्रधानांनी सोमनाथमध्ये दीड किलोमीटरचा भव्य रोड शो केला. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. ठिकठिकाणी लोककलावंतांनी सादरीकरण केले. त्यानंतर पंतप्रधानांनी सोमनाथ मंदिरात 'महापूजा' केली आणि या ऐतिहासिक सोहळ्यानिमित्त एका विशेष टपाल तिकिटाचे अनावरणही केले.
दबावासमोर झुकणार नाही
सोमनाथ : जगातील कोणतीही शक्ती भारताला झुकवू शकत नाही किंवा दबावाखाली आणू शकत नाही, असे १९९८ च्या पोखरण अणुचाचणीचा दाखला देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी ठामपणे सांगितले. सोमनाथ मंदिर पुनर्रचना सोहळ्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आयोजित 'सोमनाथ अमृत महोत्सवात' पंतप्रधान बोलत होते. यावेळी त्यांनी देशातील "तुष्टीकरणाच्या राजकारणावर" कडक शब्दांत टीका केली.