नवी दिल्ली : २०२४-२५ मध्ये राष्ट्रीय पक्षांना मिळालेल्या देणग्यांमध्ये मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत १६१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सच्या अहवालानुसार, यामध्ये सत्ताधारी भाजपचा वाटा सर्वाधिक आहे- जो इतर सर्व राष्ट्रीय पक्षांना मिळालेल्या एकूण देणगीच्या दहा पटीपेक्षा जास्त आहे.
गुरुवारी प्रसिद्ध झालेल्या या अहवालात म्हटले आहे की, आर्थिक वर्ष २०२५ मध्ये राष्ट्रीय पक्षांनी घोषित केलेल्या आकडेवारीनुसार, २०,००० रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या देणग्यांची संख्या एकूण ११,३४३ होती. त्यामधून सर्व पक्षांना मिळून तब्बल ६,६४८ कोटी रुपये मिळाले. त्यात एकट्या भाजपला ६,०७४ कोटी रुपये मिळाले. त्याखालोखाल काँग्रेसला केवळ ५१७ कोटी रुपये मिळाले.
भाजपच्या घोषित देणग्या काँग्रेस, आम आदमी पार्टी (AAP), मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया आणि नॅशनल पीपल्स पार्टी यांच्या एकत्रित देणग्यांपेक्षा दहा पटीने जास्त असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, बहुजन समाज पक्षाने आपल्याला गेल्या १९ वर्षांप्रमाणेच २०,००० रुपयांपेक्षा जास्त एकही देणगी मिळाली नसल्याचे जाहीर केले आहे.
इतर पक्षांमध्ये, ‘आप’ला २७ कोटी रुपये मिळाले (२४४ टक्के वाढ), तर ‘एनपीईपी’ला सुमारे दोन कोटी रुपये मिळाले. राजकीय निधीमध्ये कॉर्पोरेट देणग्यांचे वर्चस्व असून, ३,२४४ देणगीदारांनी माध्यमातून ६१२८ कोटी रुपये (एकूण योगदानाच्या ९२.१८ टक्के) मिळाले आहेत. तर सुमारे आठ हजार वैयक्तिक देणगीदारांनी ५०५ कोटी रुपये दिले, जे एकूण रकमेच्या ७.६१ टक्के आहे.
भाजपला २,७९४ कॉर्पोरेट देणग्यांतून ५,७१७ कोटी रुपये मिळाले, जे इतर सर्व राष्ट्रीय पक्षांना मिळालेल्या एकत्रित ४११ कोटी रुपयांच्या कॉर्पोरेट योगदानापेक्षा १३ पटीने जास्त आहेत. भाजपला २,६२७ वैयक्तिक देणगीदारांकडून ३४५ कोटी रुपये मिळाले. काँग्रेसला ११२ कॉर्पोरेट देणग्यांतून ३८३ कोटी रुपये आणि २,३५७ वैयक्तिक देणगीदारांकडून १३२ कोटी रुपये मिळाले.
प्रमुख देणगीदारांमध्ये, ‘प्रुडंट इलेक्टोरल ट्रस्ट’ने भाजप, काँग्रेस आणि ‘आप’ला मिळून एकूण २४१३ कोटी रुपये दिले. यापैकी २१८० कोटी रुपये भाजपला (पक्षाला मिळालेल्या एकूण निधीच्या ३६ टक्के), २१६ कोटी रुपये काँग्रेसला (४१.८१ टक्के) आणि १६ कोटी रुपये ‘आप’ला (४३.०८ टक्के) मिळाले.
१७१ टक्क्यांची वाढ
२०२३-२४ च्या तुलनेत २०२४-२५ मध्ये राष्ट्रीय पक्षांच्या एकूण देणग्यांमध्ये ४,१०४ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. भाजपच्या संकलनात मागील आर्थिक वर्षातील २,२४३ कोटी रुपयांच्या तुलनेत १७१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. काँग्रेसला मिळालेल्या देणग्या ८४ टक्क्यांनी वाढून २०२३-२४ मधील २८१ कोटी रुपयांवरून २०२४-२५ मध्ये ५१७ कोटी रुपये झाल्या आहेत.
हे आहेत देणगीदार
‘प्रोग्रेसिव्ह इलेक्टोरल ट्रस्ट’ने दोन देणग्यांतून ८३५ कोटी रुपये दिले, ‘एबी जनरल इलेक्टोरल ट्रस्ट’ने १६ देणग्यांतून ६२१ कोटी रुपये दिले, तर ‘न्यू डेमोक्रॅटिक इलेक्टोरल ट्रस्ट’ने सात देणग्यांतून भाजप आणि काँग्रेसला १५५ कोटी रुपये दिले. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया प्रायव्हेट लिमिटेडने तीन देणग्यांद्वारे १०० कोटी रुपये आणि रुंगटा सन्स प्रायव्हेट लिमिटेडने चार देणग्यांद्वारे २०२४-२५ मध्ये भाजपला ९५ कोटी रुपये दिले.