राष्ट्रीय

मोठी बातमी! माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णाला बलात्कार प्रकरणी जन्मठेप; १० लाखांचा दंड

कर्नाटकातील हासन लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आणि माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा (वय ३४) याला बलात्कार प्रकरणात दोषी ठरवत आज (२ ऑगस्ट) बंगळुरू येथील विशेष न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

नेहा जाधव - तांबे

कर्नाटकातील हासन लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आणि माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचा नातू प्रज्ज्वल रेवण्णा (वय ३४) याला बलात्कार प्रकरणात दोषी ठरवत आज (२ ऑगस्ट) बंगळुरू येथील विशेष न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. फार्महाऊसमध्ये काम करणाऱ्या महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपांवरून रेवण्णावर खटला सुरू होता. काल (१ ऑगस्ट) न्यायालयाने त्याला दोषी ठरवले होते आणि आज शिक्षा जाहीर करण्यात आली.

विशेष न्यायालयाचे न्यायाधीश संतोष गजानन भट यांच्या समोर २६ साक्षीदारांची उलटतपासणी झाल्यानंतर निकाल देण्यात आला. जन्मठेपेच्या शिक्षेसहित त्याच्यावर दहा लाखांचा दंडही ठोठवण्यात आला आहे. रेवण्णावर एकूण चार बलात्काराचे गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी या प्रकरणात त्याला दोषी ठरवण्यात आले आहे.

घरकाम करणाऱ्या महिलेवर बलात्कार

ही घटना २०२१ मध्ये हासन जिल्ह्यातील होलेनारसीपुरा येथील गन्निकाडा फार्महाऊस येथे घडली. पीडित महिला (वय ४८) रेवण्णा कुटुंबाच्या फार्महाऊसवर घरकाम करत होती. तिच्या आरोपानुसार, प्रज्ज्वल रेवण्णाने तिच्यावर दोन वेळा बलात्कार केला आणि त्याचे रेकॉर्डिंगही मोबाईलमध्ये केले. पीडित महिलेने २०२४ मध्ये तक्रार दाखल केल्यानंतर या प्रकरणात FIR नोंदवण्यात आली.

निवडणुकीवेळी अश्लील व्हिडिओ व्हायरल

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे प्रकरण समोर आले. हासन मतदारसंघातून रेवण्णाला पुन्हा उमेदवारी देण्यात आली होती, मात्र त्याच्याशी संबंधित अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली.

कर्नाटक सरकारने या गंभीर प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन केलं. SIT ने १२० साक्षीदारांचे जबाब नोंदवले आणि ठोस पुरावे गोळा केले. यानंतर २६ एप्रिल २०२४ रोजी रेवण्णा जर्मनीहून परत आला आणि त्याला ३१ मे रोजी अटक करण्यात आली. त्यानंतर जेडी(एस) पक्षाने त्याला निलंबित केलं. निवडणुकीतही त्याचा पराभव झाला.

गुन्ह्याचा उलगडा कसा झाला?

प्रज्ज्वल रेवण्णाच्या माजी वाहनचालकाने त्याच्या मोबाईलमधून लैंगिक अत्याचाराचे व्हिडिओ एका पेन ड्राईव्हमध्ये सेव्ह करून भाजप नेत्यांना दिले. यामुळे प्रकरण सार्वजनिक रित्या बाहेर पडले. मात्र, हे व्हिडिओ सार्वजनिक केल्यामुळे त्या वाहनचालकावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Telegram ला केंद्र सरकारची नोटीस; बेकायदेशीर चित्रपट आणि ओटीटी कंटेंटवर कारवाईचे निर्देश

Mumbai Rain : मुसळधार पावसाने मुंबईची दाणादाण; अनेक भाग जलमय, वसई-विरारलाही फटका, Video

केंद्राची मोठी कारवाई; यूएपीए अंतर्गत पाकिस्तानातील २३ जण दहशतवादी घोषित

जोगेश्वरीत भरधाव टँकरने डिलिव्हरी बॉयला चिरडलं; पळ काढणाऱ्या चालकाला नागरिकांनी केलं पोलिसांच्या हवाली, Video

Thane : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रुग्णालयात दाखल; मध्यरात्री अचानक प्रकृती बिघडली