प्रयागराज-मिर्झापूर महामार्गावर शुक्रवारी (१४) रात्री १२ च्या सुमारास बोलेरो आणि बसची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात घडला. यामध्ये १० जण जागीच ठार झाले तर १९ जण जखमी झाले आहेत. जखमींवर स्वरुप राणी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेत बोलेरो गाडीचा अक्षरशः चेंदामेंदा झाला तर मृतदेह खूप विद्रूप झाले होते. पोलिसांनी आधारकार्ड आणि मोबाईलनंबरद्वारे मृतांची ओळख पटवून त्यांच्या कुटुंबीयांना कळवले आहे. बोलेरोतील सर्व प्रवासी छत्तीसगडच्या कोरबा जिल्ह्याचे रहिवासी असून सर्व भाविक महाकुंभमेळ्याला जात होते. तर बसमधील सर्व प्रवासी मध्य प्रदेशच्या राजगड जिल्ह्यातील रहिवासी आहेत. महाकुंभमेळ्यात संगम स्नानानंतर सर्व भाविकांना घेऊन ही बस वाराणसी येथे जात होती. महाकुंभमेळ्याला १३ जानेवारीला सुरुवात झाली असून २६ फेब्रुवारीला संपणार आहे. दरम्यान, महाकुंभमेळ्याला जाणऱ्या मार्गांवर अपघाताची ही पहिलीच घटना नसून यापूर्वी देखील अशा घटना घडल्या आहेत.
महाकुंभमेळा भाविकांसोबत घडलेले अपघात
'इंडिया टुडे'ने दिलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील जबलपूर जिल्ह्यात मंगळवारी महामार्गावरून जाणाऱ्या ट्रकला गाडी धडकल्याने महाकुंभामेळ्यावरून परतणाऱ्या आंध्र प्रदेशातील सात जणांचा मृत्यू झाला होता.
आग्रा येथील एका जोडप्याचा सोमवारी महाकुंभमेळ्यावरून परत येताना ट्रकसोबत झालेल्या अपघातात मृत्यू झाला तसेच अन्य चार जण जखमी झाले. स्टेशन हाऊस ऑफिसर रुद्र प्रताप सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रक जप्त करण्यात आला आहे आणि चालकाला ताब्यात घेण्यात आले आहे.
उत्तर प्रदेशातील सोनभद्र येथे सोमवारी महाकुंभामेळ्यावरून परत जात असताना कारची बससोबत धडक झाल्याने ओडिशाच्या राउरकेला येथील एका व्यक्तीचा मृत्यू झाला आणि इतर सहा जण जखमी झाले आहेत, असे पोलिसांनी सांगितले.
'न्यूज बाईट्स'च्या माहितीनुसार, राजस्थानातील कोटा येथे महाकुंभ यात्रेकरूंना घेऊन जाणाऱ्या बसने ट्रकला धडक दिली. या घटनेत आणखी तीन जणांना आपला जीव गमवावा लागला.
तर 'लल्लन टॉप'च्या माहितीनुसार, माघी पौर्णिमा स्नानापूर्वी संगमावर बोट उलटण्याची दुर्घटना घडली. या घटनेत १० भाविक पाण्यात बुडाले. त्यापैकी ८ जणांना पुन्हा बाहेर काढण्यात यश आले तर दोन जणांचा शोध लागला नाही. यामध्ये एका महिलेचा समावेश होता. तर ८ जणांना उपचारासाठी स्वरूप राणी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. बोटीत डेहराडून आणि कर्नाटक येथील भाविक होते. स्नान करून ते पुन्हा परतीचा प्रवास करत होते.
याशिवाय महाकुंभमेळ्यात मौनी अमावस्येला (दि. २९) चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली होती. ज्यामध्ये ३० जणांचा मृत्यू आणि ६० जण जखमी झाले होते.