पंजाबमधील फतेहगड साहिब जिल्ह्यात प्रजासत्ताक दिनाच्या दोन दिवस आधी एक खळबळजनक घटना घडली. सरहिंद परिसरातील खानपूरजवळील रेल्वे लाईनवर स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. या स्फोटामागे रेल्वे लाईन उडवण्याचा कट असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्याने संपूर्ण परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली असून सुरक्षा यंत्रणांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे.
मालगाडीचे इंजिन येताच अचानक स्फोट
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री हा स्फोट झाला. त्यावेळी या मार्गावरून एक मालगाडी जात होती. मालगाडीचे इंजिन खानपूर फाटकाजवळ पोहोचताच अचानक स्फोट झाला. या घटनेत मालगाडीच्या चालकाला दुखापत झाल्याने त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मालगाडीचे आणि ट्रॅकचे नुकसान नाही
रोपर रेंजचे डीआयजी नानक सिंह यांनी सांगितले की, "शुक्रवारी (दि.२३) रात्री ९.५० च्या सुमारास किरकोळ स्फोट झाल्याची माहिती आम्हाला मिळाली. या स्फोटात मालगाडी चालकाच्या गालावर किरकोळ जखम झाली आहे. मालगाडीचे आणि ट्रॅकचे कोणतेही मोठे नुकसान झाले नाही. तसेच, ट्रेनची वाहतूक लवकरच पुन्हा सुरू करण्यात येईल."
पोलिसांचा तपास सुरू
"पंजाब पोलिस या घटनेची शास्त्रीय पद्धतीने चौकशी करत असून आरोपीला लवकरच अटक केली जाईल. पुढील तपासासाठी फॉरेन्सिक्स आणि इतर एजन्सींच्या टीम्स येथे बोलावण्यात आल्या आहेत," अशी माहिती डीआयजी नानक सिंह यांनी दिली.
तथापि, या प्रकरणाची पंजाब पोलिसांकडून सखोल चौकशी सुरू असून, अन्य तपास यंत्रणांशीही समन्वय साधण्यात आला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा सतर्क असून, परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे.