नवी दिल्ली/चंडीगड : पंजाब, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तर प्रदेशात मुसळधार पावसाने थैमान घातले असून, अनेक ठिकाणी पूर आणि भूस्खलनाच्या घटना घडल्या आहेत. यामुळे आतापर्यंत अनेकांना प्राण गमवावे लागले असून, हजारो लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले. पंजाबमधील आठ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसानंतर १०१८ गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे.
पूर आणि पावसामुळे राज्यात आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला असून ३ जण बेपत्ता आहेत.प्रशासनाने तातडीने बचावकार्य हाती घेत ११ हजारांहून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले.
रावी नदीची पाण्याची पातळी वाढल्याने गुरुदासपूर जिल्ह्यातील घोणेवाले येथील धुस्सी बंधारा फुटला. यामुळे पुराचे पाणी सुमारे १५ किलोमीटर दूर असलेल्या अजनाला शहरापर्यंत पोहोचले असून, ८० गावे पाण्याखाली गेली आहेत.