राहुल गांधींना मोठा दिलासा! अमित शहांविरोधातील वक्तव्याप्रकरणी मानहानीच्या खटल्यातून निर्दोष मुक्तता संग्रहित छायाचित्र
राष्ट्रीय

राहुल गांधींना मोठा दिलासा! अमित शहांविरोधातील वक्तव्याप्रकरणी मानहानीच्या खटल्यातून निर्दोष मुक्तता

भाजपचे तत्कालीन जिल्हा उपाध्यक्ष आणि सुलतानपूर जिल्हा सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष विजय मिश्रा यांनी ४ ऑगस्ट २०१८ रोजी राहुल गांधी यांच्याविरोधात मानहानीची तक्रार दाखल केली होती.

किशोरी घायवट-उबाळे

लखनऊ : लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना २०१८ मधील फौजदारी मानहानीच्या खटल्यात मोठा दिलासा मिळाला आहे. उत्तर प्रदेशातील सुलतानपूर येथील खासदार-आमदार विशेष न्यायालयाने सोमवारी (दि. २६) त्यांची निर्दोष मुक्तता केली. भाजपचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याविरोधात कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी राहुल गांधी यांच्याविरोधात हा खटला दाखल करण्यात आला होता. दरम्यान, न्यायालयाच्या निकालासाठी सुलतानपूरला जात असताना राहुल गांधी यांच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात झाला होता. या अपघाताच्या चौकशीसाठी उत्तर प्रदेश पोलिसांनी तीन सदस्यीय विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना केली आहे.

काय आहे नेमके प्रकरण?

८ मे २०१८ रोजी कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान बंगळुरू येथे झालेल्या सभेत राहुल गांधी यांनी अमित शहा यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून हा मानहानीचा खटला दाखल करण्यात आला होता. भाजपच्या प्रामाणिक राजकारणाच्या दाव्यांवर प्रश्न उपस्थित करताना, पक्षाचे तत्कालीन अध्यक्ष अमित शहा हे एका खून प्रकरणातील आरोपी असल्याचा उल्लेख राहुल गांधी यांनी केल्याचा आरोप आहे.

या वक्तव्यावरून भाजपचे तत्कालीन जिल्हा उपाध्यक्ष आणि सुलतानपूर जिल्हा सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष विजय मिश्रा यांनी ४ ऑगस्ट २०१८ रोजी राहुल गांधी यांच्याविरोधात मानहानीची तक्रार दाखल केली होती.

न्यायालयीन प्रक्रियेत काय घडलं?

या प्रकरणात न्यायालयाने २७ नोव्हेंबर २०२३ रोजी राहुल गांधी यांना समन्स बजावले होते. त्यानंतर २० फेब्रुवारी २०२४ रोजी ते न्यायालयासमोर हजर झाले. त्यावेळी त्यांना जामीन मंजूर करण्यात आला होता.

खटल्याच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने तक्रारदार विजय मिश्रा यांच्यासह अनिल मिश्रा आणि रामचंद्र दुबे या तीन साक्षीदारांचे जबाब नोंदवले होते. तसेच, बंगळुरू येथील सभेच्या रेकॉर्डिंगमधील आवाजाची राहुल गांधी यांच्या आवाजाच्या नमुन्याशी पडताळणी करण्याची मागणी तक्रारदारांनी केली होती. मात्र, कनिष्ठ न्यायालयाने ही मागणी फेटाळली. सत्र न्यायालयानेही हा निर्णय कायम ठेवला. त्यानंतर या आदेशांना अलाहाबाद उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले मात्र, तेथेही याचिका फेटाळण्यात आली.

सुनावणीदरम्यान राहुल गांधी यांनी आपले वक्तव्य सद्भावनेने केले होते आणि कोणाचीही बदनामी करण्याचा हेतू नव्हता, अशी भूमिका मांडली होती. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद १२ ऑक्टोबर रोजी पूर्ण झाला. त्यानंतर न्यायालयाने अंतिम निकालासाठी २६ ऑक्टोबर ही तारीख निश्चित केली होती.

सोहराबुद्दीन प्रकरणाशी अमित शहा यांचे नाव जोडले गेले होते

राहुल गांधी यांच्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांचे नाव २००५ मधील सोहराबुद्दीन शेख कथित बनावट चकमक प्रकरणाशी जोडले गेले होते. मात्र, मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाने २०१४ मध्ये अमित शहा यांना या प्रकरणातून आरोपमुक्त केले होते.

राहुल गांधींच्या निर्दोष मुक्ततेचे काँग्रेसकडून स्वागत

न्यायालयाने राहुल गांधी यांची निर्दोष मुक्तता केल्यानंतर उत्तर प्रदेश काँग्रेसने या निर्णयाचे स्वागत केले. अमित शहा यांच्याविरोधातील वक्तव्याशी संबंधित मानहानीच्या खटल्यातून राहुल गांधी यांची मुक्तता झाल्याचे पक्षाने म्हटले आहे.

राहुल गांधींच्या ताफ्यातील अपघाताच्या चौकशीसाठी SIT

दरम्यान, सोमवारी सकाळी राहुल गांधी लखनऊहून सुलतानपूरला जात असताना पूर्वांचल द्रुतगती मार्गावर त्यांच्या ताफ्यामागील वाहनांचा एका रुग्णवाहिकेशी अपघात झाला. या दुर्घटनेत पाच वाहनांचा समावेश होता आणि काही जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे.

या अपघाताची गंभीर दखल घेत उत्तर प्रदेशचे पोलिस महासंचालक राजीव कृष्णा यांनी तीन सदस्यीय विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. लखनऊ परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक किरण एस. या पथकाचे नेतृत्व करणार आहेत. सुलतानपूरचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक ब्रिज नारायण सिंह आणि वाहतूक विभागाचे पोलिस उपअधीक्षक राम कृष्ण चतुर्वेदी यांचाही या पथकात समावेश आहे.

अपघात नेमका कशामुळे झाला, ताफ्यातील वाहनांच्या हालचालींमध्ये काही त्रुटी होत्या का आणि सुरक्षाव्यवस्था किंवा वाहतूक व्यवस्थापनात हलगर्जीपणा झाला होता का, याचा तपास एसआयटी करणार आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

राहुल गांधींच्या ताफ्यातील वाहनांचा भीषण अपघात; एकमेकांवर आदळल्या ५ गाड्या, १ रुग्णवाहिका

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मध्य रेल्वेचा खोळंबा; ठाणे-मुलुंडदरम्यान ओव्हरहेड वायरमध्ये तार अडकली; प्रवासी संतप्त, रुळांवरून पायपीट

प्रेमविवाहावरून येवल्यात लग्नमंडपात मोठा राडा; नवरदेवाच्या अंगावर डिझेल टाकण्याचा प्रयत्न? दोन्ही गटांत तुंबळ हाणामारी

आरएमसी मिक्सरने नवविवाहितेचे दोन्ही पाय चिरडले; मिरा-भाईंदरमध्ये भीषण अपघात

Washim : 'कॉल रेकॉर्डिंग घरच्यांना ऐकवेन...' धमकी देत अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार, गर्भवती झाल्यानंतर गंभीर प्रकार उघड