नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महात्मा गांधीजींचे विचार आणि गरीबांचा हक्क या दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार आहे, अशी टीका लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मंगळवारी केली. मंगळवारी सरकारने लोकसभेत एक विधेयक सादर केले, ज्यात ‘मनरेगा’चे नाव बदलून ‘विकसित भारत-जी राम जी योजना’ असे करण्याचा प्रस्ताव आहे. यावर काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतल्याने लोकसभेत प्रचंड गदारोळ झाला.
राहुल गांधी म्हणाले, ‘मनरेगा’ योजना ही महात्मा गांधींच्या 'ग्राम-स्वराज'च्या स्वप्नाचा जिवंत आविष्कार आहे. कोट्यवधी ग्रामीण लोकांच्या जीवनाचा आधार असलेली ही योजना कोविड काळात त्यांचे आर्थिक सुरक्षा कवच सिद्ध झाली. मात्र, मोदींना ही योजना नेहमीच खुपत राहिली आहे आणि गेल्या दहा वर्षांपासून ते ती कमकुवत करण्याचा प्रयत्न करीत आहेत. आता ते ‘मनरेगा’चे नामोनिशान मिटवण्यात येत आहे.
मोदी याच ‘मनरेगा’ योजनेत बदल करून सर्व शक्ती केवळ आपल्या हातात केंद्रित करू इच्छित आहेत. आता बजेट, योजना आणि नियम केंद्र सरकार ठरवेल, तर राज्यांना ४० टक्के खर्च उचलण्यास भाग पाडले जाईल. एवढेच नाही, तर बजेट संपल्यावर किंवा पीक काढणीच्या हंगामात दोन महिने कोणालाही काम मिळणार नाही, असेही त्यांनी नमूद केले.
हा महात्मा गांधींच्या आदर्शांचा अपमान
आधार, रोजगाराचा हक्क, जो काम मागेल त्याला काम मिळेल, गावाला विकासाचे काम स्वतः ठरवण्याचे स्वातंत्र्य आणि केंद्र सरकारकडून मजुरीचा पूर्ण खर्च आणि साहित्याच्या खर्चाचा ७५ टक्के भार, अशा मूलभूत विचारांवर ‘मनरेगा’ आधारलेली होती. मात्र, हे नवीन विधेयक महात्मा गांधींच्या आदर्शांचा अपमान असून या विधेयकाचा विरोध गावातील गल्ल्यांपासून संसदेपर्यंत केला जाईल, असा इशाराही राहुल गांधी यांनी दिला आहे.