नवी दिल्ली: मनरेगा बंद करणे म्हणजे भारतीय लोकशाहीवरील हल्ला आहे, असे काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शनिवारी येथे सांगितले. मनरेगाचे नाव बदलण्याचा निर्णय कॅबिनेट आणि राज्य सरकारांना विचारात न घेता थेट घेण्यात आला असून सध्या "मोदी वन मॅन शो" सुरू आहे आणि मोदी जे करायचे ठरवतात तेच करतात. हा निर्णय संघराज्य रचनेवरील हल्ला असून या निर्णयाचा फायदा दोन-तीन अब्जाधीशांना होणार आहे, तर त्याचा तोटा ग्रामीण भागाला सोसावा लागणार आहे, असेही राहुल म्हणाले.
मनरेगा ही केवळ योजना नव्हती, तर हक्कांवर आधारित संकल्पना होती, ज्यामुळे देशातील कोट्यवधी लोकांना किमान मजुरीची हमी मिळत होती. त्यामुळे मनरेगा बंद करणे म्हणजे हक्कांवर आधारित संकल्पनेवर थेट आघात आहे. हा पैसा राज्यांकडून काढून केंद्राकडे खेचला जात आहे. सत्ता आणि आर्थिक अधिकारांचे संकुचन होत आहे आणि हा निर्णय थेट पंतप्रधान कार्यालयातून घेण्यात आलेला आहे, असे राहुल गांधी म्हणाले.
संघराज्य रचनेवरील हल्ला
दरम्यान, राहुल गांधी म्हणाले की, मनरेगा रद्द करणे हा देशाच्या हक्कांवर आधारित व्यवस्था आणि संघराज्य रचनेवर थेट हल्ला आहे. त्यांनी म्हटले की, हा निर्णय गरीब आणि राज्यांचे हक्क कमकुवत करतो. मनरेगा ही केवळ रोजगार योजना नव्हती, तर एक विकास चौकट होती ज्याचे जगभरात कौतुक झाले. या योजनेने ग्रामीण भारताला बळकटी दिली आणि लोकांना सन्मानाने काम करण्याचा अधिकार दिला. पंतप्रधानांनी त्यांच्या मंत्रिमंडळाशी सल्लामसलत न करता आणि कोणताही अभ्यास न करता एकतर्फीपणे मनरेगा रद्द केल्याचा आरोप त्यांनी केला.
गरीबांना फटका बसणार
'मनरेगा' ही योजना हक्कांवर आधारित होती. 'मनरेगा'मुळे देशात कोट्यवधी नागरिकांना किमान रोजगार मिळत होता. पण आता रोजगाराच्या अधिकारांवर हल्ला झाला आहे. दुसरे म्हणजे राज्यांच्या अधिकारांवरही गदा आली आहे. योजनेसाठी केंद्र सरकार राज्यांकडून निधी घेत आहे. आर्थिक आणि सत्तेचे केंद्रीकरण होत आहे. यामुळे देशाचे नुकसान होईल. गरीबांना या धोरणाचा फटका बसणार आहे. त्यांना वेदना होतील, असे राहुल गांधी यावेळी म्हणाले.
दिग्विजय सिंह यांनी मोदींचा फोटो केला द्विट
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी पंतप्रधान मोदी यांचा जुने छायाचित्र शनिवारी प्रकाशित केले. संघ व भाजपचा कार्यकर्ता मुख्यमंत्री व पंतप्रधान बनतो. ही संघटनेची शक्ती आहे, अशी कॅप्शन त्याला टाकली. त्यानंतर देशभरात मोठी खळबळ उडाली. काँग्रेसच्या विद्यमान परिस्थितीवर दिग्विजय सिंह हे नाराज असल्याचे दिसून येत आहे.