नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या 'दिमागी नक्षल' या टीकेचा समाचार घेत, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी मोदींना, देशद्रोही कोण आणि परकीय शक्तींच्या नियंत्रणाखाली कोण आहे, यावर समोरासमोर चर्चा करण्याचे पुन्हा एकदा आव्हान दिले आहे.
'सीआरपीएफ' जवानांना उद्देशून केलेल्या पोस्टमध्ये गांधी यांनी म्हटले आहे की, जवानांनी पंतप्रधानांच्या खोट्या गोष्टींवर विश्वास ठेवलेला नाही. चर्चेनंतर कोणत्याही पंतप्रधानांचे जवानासमोर उभे राहण्याचे धाडस होणार नाही, असा दावा त्यांनी केला. मोदी यांनी रविवारी छत्तीसगडमधील बस्तर येथील कॅम्पमध्ये 'सीआरपीएफ' जवानांसोबत दिवाळी साजरी करताना म्हटले होते की, शस्त्रास्त्रे बाळगणाऱ्या माओवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. मात्र 'दिमागी नक्षल' अनेक राजकीय पक्ष आणि संस्थांमध्ये घुसले असून ते संविधानाविरुद्ध आणि लोकशाहीविरुद्ध लोकांना भडकावत आहेत. अशा घटकांना ओळखून त्यांचा पराभव करणे आणि देश सुरक्षित ठेवणे आवश्यक असल्याचे मोदी म्हणाले.
खोट्यावर विश्वास नाही हे चेहरे सांगतात...
गणवेशातील शूर पुरुष आणि महिलांसोबत सण साजरा करण्याची आपली परंपरा त्यांनी यावेळीही कायम ठेवली. या विधानांवर राहुल गांधी यांनी 'एक्स' या समाजमाध्यमावर 'सीआरपीएफ' जवानांना उद्देशून लिहिले की, 'तुमचे चेहरे सर्व काही सांगत होते. तुम्ही पंतप्रधानांच्या खोट्या गोष्टींवर विश्वास ठेवलेला नाही. त्यांनी आम्हाला नक्षलवादी म्हटले. माझे आव्हान कायम आहे. देशद्रोही कोण आणि परकीय शक्तींच्या नियंत्रणाखाली कोण आहे, यावर त्यांनी माझ्याशी चर्चा करावी. कोणत्याही वेळी आणि कोणत्याही ठिकाणी. माझी खात्री आहे की, चर्चेनंतर पंतप्रधानांचे एकाही जवानासमोर उभे राहण्याचे धाडस होणार नाही'.
'झोला' उचलण्याची वेळ
दरम्यान, मोदी अस्वस्थ आणि हताश झाले असून त्यांची 'झोला' उचलण्याची वेळ आता जवळ आली आहे, असा टोला काँग्रेसने लगावला आहे. मोदींनी ऑगस्टमध्ये स्वातंत्र्यदिनाच्या भाषणातही 'दिमागी नक्षल' असा उल्लेख करत वैचारिक समर्थक हिंसाचाराला प्रोत्साहन देण्याची संधी शोधत असल्याचे म्हटले होते. लोकशाहीतील विरोधाला बदनाम करण्यासाठी पंतप्रधान असे शब्द जाणीवपूर्वक वापरत असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. राहुल गांधी पंतप्रधानांना वारंवार खुल्या चर्चेचे आव्हान देत आहेत आणि केवळ पाच मिनिटांत पंतप्रधान देशद्रोही असल्याचे सिद्ध करू, असा दावाही त्यांनी केला आहे.