ही नेमणूक अपमानास्पद; मध्यरात्री घेतलेल्या निर्णयावर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे टीकास्त्र संग्रहित छायाचित्र
राष्ट्रीय

ही नेमणूक अपमानास्पद; मध्यरात्री घेतलेल्या निर्णयावर विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे टीकास्त्र

नवी दिल्ली : देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निवड प्रक्रियेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलेले असताना मध्यरात्री घाईघाईने नवीन मुख्य निवडणूक आयुक्त नेमण्याचा निर्णय घेणे हे अपमानास्पद असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासाठी हे अशोभनीय आहे, अशी संतप्त टीका लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मंगळवारी केली.

Swapnil S

नवी दिल्ली : देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निवड प्रक्रियेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलेले असताना मध्यरात्री घाईघाईने नवीन मुख्य निवडणूक आयुक्त नेमण्याचा निर्णय घेणे हे अपमानास्पद असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासाठी हे अशोभनीय आहे, अशी संतप्त टीका लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मंगळवारी केली.

केंद्र सरकारने सोमवारी रात्री उशिरा ज्ञानेशकुमार यांची मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती केली. मोदी यांच्या अध्यक्षतेखालील समितीमध्ये राहुल गांधीही होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयात नियुक्तीचे प्रकरण प्रलंबित असल्याने ही बैठक पुढे ढकलावी, असे गांधी यांनी सरकारला सांगितले. यासंदर्भात गांधी यांनी नाराजीचे पत्रही समितीला दिले. मुख्य निवडणूक आयुक्त आणि अन्य निवडणूक आयुक्तांच्या नियुक्त्यांबाबतच्या याचिकेवर बुधवारी प्राधान्याने सुनावणी घेण्यात येईल, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

सरन्यायाधीशांना वगळणे चिंताजनक

मोदी सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून सरन्यायाधीशांना या निवड समितीतून काढून टाकल्याचा दावाही राहुल गांधी यांनी केला. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेबाबत मतदारांच्या मनात चिंता वाढली आहे. हे सरकारचे जबाबदारीपासून पळ काढणारे आणि लोकशाही संस्थांच्या अनादराचे कृत्य आहे, असेही ते म्हणाले.

विरोधी पक्षनेता म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि आपल्या राष्ट्र स्थापनेच्या कार्यात योगदान दिलेल्या नेत्यांचा आदर राखणे आणि सरकारला जाब विचारणे हे माझे कर्तव्य आहे. या समितीच्या निवडीवर आणि या प्रक्रियेलाच सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलेले असताना आणि ४८ तासांपेक्षा कमी वेळात त्यावर सुनावणी होणार असताना पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी मध्यरात्रीच नवीन मुख्य निवडणूक आयुक्त नेमण्याचा निर्णय घेणे हे संतापजनक आहे, असे राहुल गांधी म्हणाले.

निवड प्रक्रिया शंका निर्माण करणारी

हस्तक्षेपापासून मुक्त असलेल्या स्वतंत्र निवडणूक आयोगाचा सर्वात मूलभूत पैलू म्हणजे निवडणूक आयुक्त आणि मुख्य निवडणूक आयुक्त निवडण्याची प्रक्रिया हा आहे. पण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून आणि भारताच्या सरन्यायाधीशांना समितीमधून काढून टाकून मोदी सरकारने निवडणूक आयुक्तांच्या निवडीच्या प्रक्रियेबद्दल लाखो मतदारांच्या मनात शंका निर्माण केली आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

ज्ञानेश कुमार यांची मुख्य निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती

मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या निवड समितीच्या बैठकीत सोमवारी ज्ञानेश कुमार यांच्या नावाला मंजुरी देण्यात आली. त्यानंतर राष्ट्रपतींकडून मंजुरी मिळाल्यानंतर कायदा मंत्रालयाने त्यांच्या नावाची घोषणा केली. मात्र, काँग्रेसने ज्ञानेश कुमार यांची पुढील मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्याच्या प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले. नवीन मुख्य निवडणूक आयुक्तांसाठी पाच नावे देण्यात आली होती. मात्र, राहुल गांधी यांनी पाचही नावांचा या पदासाठी विचार करण्यास नकार दिला. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे ही बैठक व्हायला नको होती, असे राहुल यांनी म्हटले आहे.

मुंबईत घरांवर पहिला हक्क मराठी माणसाचा! घर नाकारणाऱ्या बिल्डरवर होणार कारवाई; शंभूराज देसाई यांची घोषणा

अचानक हार्ट अटॅकची भीती; कर्नाटकमध्ये रुग्णालयांत लोकांची प्रचंड गर्दी, घाबरू नका - डॉक्टरांचे आवाहन

महाराष्ट्रातील किल्ल्यांच्या समावेशाकडे लागले लक्ष... युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू

IND vs ENG 2025 : क्रिकेटच्या पंढरीत भारताची कसोटी! लॉर्ड्स स्टेडियमवर आजपासून तिसरा सामना, मालिकेत आघाडी घेण्याचे लक्ष्य

लैंगिक छळाच्या तक्रारीनंतर केलेली बदली रद्द; सहाय्यक प्राध्यापक महिलेला उच्च न्यायालयाचा दिलासा