नवी दिल्ली : उत्तराखंडमधील हलगानी येथे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या सभेच्या ठिकाणी करण्यात आलेला 'शुद्धीकरण' सोहळा हा एक गंभीर 'अपराध' आहे, असा थेट हल्लाबोल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर केला. या प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीने एफआयआर दाखल करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली.
हलद्वानी येथील रामलीला मैदानावर ८ ऑगस्ट रोजी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची जाहीर सभा झाली होती. त्यानंतर १० ऑगस्ट रोजी 'श्री राम सेना' या संघटनेने त्या जागेचे शुद्धीकरण केल्याचा आरोप उत्तराखंड काँग्रेसचे अध्यक्ष गणेश गोदियाल यांनी केला आहे. यावरून संसदेत गदारोळ झाला होता. खर्गे यांनी स्वतः हा मुद्दा वरिष्ठ सभागृहात उपस्थित करत संबंधितांवर अस्पृश्यता निवारण कायद्यांतर्गत कारवाई करण्याची मागणी केली होती.
ही घटना भाजप आणि संघाची मानसिकता दर्शवते. त्यांना दलित समाजाने प्रगती केलेली, सन्मानाने जगलेले आणि यशस्वी झालेले नको आहे. उत्तराखंडमध्ये काँग्रेस अध्यक्षांना न्याय मिळवून देणे हे केंद्र आणि राज्य सरकारचे कर्तव्य आहे, असे स्पष्ट करत राहुल गांधी यांनी भाजपच्या उत्तराखंड प्रदेशाध्यक्षांवर या 'शुद्धीकरण' कृत्याचे समर्थन केल्याचा आरोप केला. या घटनेला २० दिवस उलटूनही दोषींवर कोणतीही कारवाई झालेली नाही, याकडे राहुल यांनी लक्ष वेधले. हे कृत्य करणाऱ्यांवर एससी/एसटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश पंतप्रधानांनी दिले पाहिजेत. हा लढा दोन विचारसरणींमधला आहे. एका बाजूला डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी आणि जवाहरलाल नेहरू यांनी दिलेले संविधान आहे, तर दुसऱ्या बाजूला भाजप आणि आरएसएसची विचारसरणी आहे, असेही ते म्हणाले.
भाजपचा खुलासा
उत्तराखंड भाजप अध्यक्ष महेंद्र भट यांनी या आरोपांचे खंडन केले. एका धार्मिक स्थळावर अयोग्य घोषणाबाजी करून पवित्रता भंग करण्यात आली होती, त्यामुळे तेथे धार्मिक विधी करण्यात आला, असा दावा त्यांनी केला. भाजपने अस्पृश्यतेच्या आरोपांचा पूर्णपणे इन्कार केला आहे.