नवी दिल्ली : काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शहरी पायाभूत सुविधांच्या वाईट स्थितीबद्दल सरकार आणि व्यवस्थेवर गंभीर आरोप केले. सध्या सामान्य नागरिकाचे जीवन असह्य झाले असून लोकांना घाणीचे साम्राज्य, दूषित पाणी, अराजकता अशा प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे. विशेष म्हणजे, ही परिस्थिती कोणत्याही एका शहरापुरती मर्यादित नसून देशभरातील शहरी भागांमध्ये हीच परिस्थिती असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली.
राहुल गांधी यांनी समाजमाध्यमांवर एक व्हिडिओ टाकत सरकारच्या कार्यपद्धतीचे वाभाडे काढले. दिल्लीच्या किरारी परिसरातील घरांसमोर साचलेले पाणी आणि कचऱ्याची भीषण परिस्थिती या व्हिडिओत दाखवण्यात आली आहे. सरकार आणि व्यवस्था सतत दुर्लक्ष करत असलेले हे सत्य आहे, असे आरोप त्यांनी सरकारवर केले.
आपल्या जबाबदाऱ्यांविषयी आपण आता पेटून उठलो नाही तर ही परिस्थिती प्रत्येक घरादारापर्यंत पोहोचेल. जनतेने प्रश्न विचारावेत, व्यवस्थेला जबाबदार धरावे आणि मूलभूत सुविधांचा हक्क म्हणून मागणी करण्याचे आवाहन राहुल गांधी यांनी केले. या विधानाकडे केवळ राजकीय हल्ला म्हणूनच नव्हे तर सामाजिक इशारा म्हणूनही पाहिले जात आहे. शहरी भारतातील वाढती अराजकता, कमकुवत प्रशासन आणि जबाबदारीचा अभाव लोकशाहीची मुळे कमकुवत करत आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
लोभाने संवेदनशीलतेवर मात केलीय
राहुल गांधी म्हणाले की, “आज व्यवस्था पूर्णपणे सत्तेसमोर शरण गेली आहे. अधिकारी, नेते आणि संस्था एकमेकांच्या पाठिशी थाप मारून जनतेला चिरडण्यात व्यस्त आहेत. सामान्य नागरिकाच्या दुःखाची कोणीही काळजी करत नाही. कारण लोभाने संवेदनशीलतेवर मात केली आहे. लोभ आता देशात एक साथीचा रोग बनला आहे आणि शहरी क्षय हे त्याचे सर्वात भयानक प्रकटीकरण आहे. समाज मरत आहे कारण आपण घाण, अराजकता आणि अमानवी परिस्थितीला स्वीकारले आहे.”