पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याआधीच राजस्थानमधील रिफायनरीला आग; लोकार्पणाआधी मोठी दुर्घटना; सुरक्षा यंत्रणा अलर्ट 
राष्ट्रीय

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याआधीच राजस्थानमधील रिफायनरीला आग; लोकार्पणाआधी मोठी दुर्घटना; सुरक्षा यंत्रणा अलर्ट

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या म्हणजेच २१ एप्रिल रोजी बालोतरा जिल्ह्यातील पचपदरा येथे रिफायनरीचे लोकार्पण करणार होते. त्या कार्यक्रमाच्या २४ तास आधी रिफायनरी परिसरात भीषण आग लागण्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेमुळे मोठ्या प्रकल्पाचे कोट्यवधींचे नुकसान झाले असून सोबतच व्हीव्हीआयपी सुरक्षेसंदर्भात गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

Swapnil S

जयपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या म्हणजेच २१ एप्रिल रोजी बालोतरा जिल्ह्यातील पचपदरा येथे रिफायनरीचे लोकार्पण करणार होते. त्या कार्यक्रमाच्या २४ तास आधी रिफायनरी परिसरात भीषण आग लागण्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेमुळे मोठ्या प्रकल्पाचे कोट्यवधींचे नुकसान झाले असून सोबतच व्हीव्हीआयपी सुरक्षेसंदर्भात गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

बालोतरा जिल्ह्यातील पचपदरा येथे रिफायनरी उभारण्यात आली आहे. या रिफायनरीचे मोदींच्या हस्ते उद्या होणार होते. त्या पार्श्वभूमीवर लोकार्पणाची तयारी सुरु होती. तयारी अंतिम टप्प्यात आलेली असताना एका विशेष युनिटला आग लागली. आगीच्या मोठ्या ज्वाळा दिसू लागल्या. आगीची तीव्रता हळूहळू वाढली. अग्निकल्लोळ कित्येक किलोमीटर दूरवरुनही अगदी स्पष्टपणे दिसत होता.

मोदी यांची सुरक्षा केंद्रस्थानी ठेवून एसपीजी आणि राजस्थान पोलीस या परिसरात नो फ्लाय झोन तयार केला होता. या भागाचे रुपांतर अभेद्य किल्ल्यात करण्यात आले आहे. मोदी यांनी लोकार्पण करायच्या २४ तास आधी आगीची घटना घडल्यानं प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाल्या आहेत.

आगीची माहिती मिळताच रिफायनरीमधील अत्याधुनिक इन-हाऊस फायर सेफ्टी सिस्टिम सक्रिय झाली. रिफायनरीच्या परिसरात असलेल्या अग्निशमन दलाच्या शेकडो गाड्या आणि हायड्रंट सिस्टिमने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरु केला. एचपीसीएलचे तांत्रिक तज्ज्ञांचे पथक सध्या डॅमेज कंट्रोल करत आहे. या संदर्भात अद्याप तरी कोणत्याही जीवितहानीचे वृत्त नाही. पण रिफायनरीमधील संवेदनशील यंत्रणांचे प्रचंड नुकसान झाल्याचे समजते.

मोदींच्या दौऱ्याच्या २४ तास आधी घडलेली दुर्घटना सुरक्षा व्यवस्थेवर अनेक प्रश्न निर्माण करणारी आहे. अति संवेदनशील भागात आग लागण्यामागचे नेमके कारण काय, ही घटना केवळ तांत्रिक स्पार्किंगमधून घडली की सुरक्षेत मोठी चूक झाल्याने घडली, असे प्रश्न निर्माण झाले आहेत. उद्या होणाऱ्या भव्य लोकार्पण कार्यक्रमाच्या वेळेत बदल केले जाणार का, या कार्यक्रमाच्या स्वरुपात बदल होणार का, हे प्रश्नदेखील कायम आहेत.

अमेरिका-इराण शांतता चर्चेच्या दुसऱ्या फेरीवर अनिश्चिततेचे सावट; युद्धबंदीची मुदत आज संपणार; बैठकीकडे संपूर्ण जगाचे लक्ष

सरकारी कर्मचारी, शिक्षक आजपासून बेमुदत संपावर; रुग्णसेवेसह शासकीय कामांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता

अमली पदार्थांची तस्कर अश्विनी पॉल अटकेत; मूळची पुण्याची असलेली बारबाला, नंतर बनली ड्रग्ज माफिया क्वीन

लोकल विलंबाने हाल; डोंबिवली स्थानकाजवळ डबा घसरला; अनेक लोकल रद्द, सेवा विस्कळीत; प्रवाशांची कसरत

मोदीविरोधातून महिलाविरोधाकडे