आयपीएलच्या दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात शुक्रवारी राजस्थान रॉयल्सने रॉयल चॅलंेजर्स बंगळुरूचा सात गडी राखून पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम फेरीत आता रविवारी राजस्थानचा मुकाबला गुजरात टायटन्सशी होणार आहे.
विजयासाठीचे १५८ धावांचे लक्ष्य राजस्थानने १८.१ षटकांत तीन गडी बाद १६१ धावा करीत साध्य केले. सलामीवीर जॉस बटलरने (६० चेंडूंत नाबाद १०६) विजयात मोलाचा वाटा उचलला. विजयासाठी शिमरॉन हेटमायरने (३ चेंडूंत नाबाद २) बटलरला अखेरच्या क्षणी धैर्याने साथ दिली. देवदत्त पडिक्कलला (१२ चेंडूंत ९) फार काही करता आले नाही. यशस्वी जैस्वाल (१३ चेंडूंत २१) आणि कर्णधार संजू सॅमसन (२१ चेंडूंत २३) यांचाही विजयाला हातभार लागला. बंगळुरूचे गोलंदाज जोश हेझलवूडने दोन विकेट्स घेतल्या. वानिंदू हसरंगाने एक फलंदाज बाद केला. त्याआधी, राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रित केल्यानंतर रजत पाटीदारच्या (४२ चेंडूंत ५८) झुंजार अर्धशतकाच्या जोरावर रॉयल चॅलेजर्स बंगळुरूने निर्धारित २० षट्कांत आठ बाद १५७ धावा केल्या. आव्हानात्मक धावसंख्या उभारण्यासाठी कर्णधार फॅफ ड्यू प्लेसिस (२७ चेंडूंत २५), ग्लेन मॅक्सवेल (१३ चेंडूंत २४) यांनीही मोलाचे योगदान दिले. राजस्थान रॉयल्सचे प्रसिद्ध कृष्णा, ओबेद मॅकॉय यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतले, तर ट्रेंट बोल्ट आणि रविचंद्रन अश्विन यांनी प्रत्येकी एक फलंदाज बाद केला. गोलंदाजांचा भेदक माऱ्यामुळे विशिष्ट अंतराने फलंदाज बाद होत गेल्याने मोठी धावसंख्या उभारण्यात बंगळुरूला अपयश आले. बंगळुरूच्या डावाची सुरुवात निराशाजनक झाली. बंगळुरूला प्रसिद्ध कृष्णाने दुसऱ्याच षट्कातील पाचव्या चेंडूवर जबर धक्का दिला. त्याने अव्वल फलंदाज विराट कोहलीला सात धावांवर बाद केले. सॅमसनने त्याचा झेल टिपला. त्यानंतर कर्णधार ड्यू प्लेसिस आणि डाव सावरण्याबरोबरच धावसंख्या वाढविण्याचाही प्रयत्न केला. ड्यू प्लेसिस अकराव्या षट्कातील चौथ्या चेंडूवर बाद झाला. मॅकॉयने त्याला अश्विनच्या हाती झेल देण्यास भाग पाडले. २७ चेंडूंत २५ धावा करताना प्लेसिसने तीन चौकार लगावले. ग्लेन मॅकसवेलने धडाकेबाज फलंदाची केली; परंतु मोठी खेळी करण्यात त्याला अपयश आले.