संग्रहित छायाचित्र  
राष्ट्रीय

दहशतवाद्यांना धर्माच्या नव्हे, कर्माच्या आधारावर मारले - राजनाथ सिंह

पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी लोकांना त्यांचा धर्म विचारून त्यांची हत्या केली, आपल्या सैनिकांनी दहशतवाद्यांना धर्माच्या आधारावर नाही तर त्यांच्या कर्माच्या आधारावर ठार केले, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी स्पष्ट केले.

Swapnil S

जोधपूर : पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी लोकांना त्यांचा धर्म विचारून त्यांची हत्या केली, आपल्या सैनिकांनी दहशतवाद्यांना धर्माच्या आधारावर नाही तर त्यांच्या कर्माच्या आधारावर ठार केले, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी स्पष्ट केले.

जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाम येथे दहशतवाद्यांनी २६ जणांची हत्या केली होती. यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये हल्ले करत जोरदार प्रत्युत्तर दिले होते.

राजस्थानच्या जोधपूर येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना संरक्षणमंत्र्यांनी यासंबंधी विधान केले. भारत ‘वसुधैव कुटुंबकम’ या संकल्पनेवर विश्वास ठेवतो आणि जाती किंवा धर्माच्या आधारावर भेदभाव करत नाही, असेही राजनाथ सिंह म्हणाले.

आपल्या लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’मधून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आणि या कारवाईमध्ये निश्चित करण्यात आलेल्या लक्ष्यांवर अचूक हल्ले केले गेले. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी संघटनांशी संबंधित अनेक तळांवर हे हल्ले करण्यात आले, असे ते म्हणाले. सैनिकांच्या कुटुंबीयांचा सन्मान आणि ‘डिफेन्स आणि स्पोर्ट अकादमी’च्या उद्घाटनासाठी राजनाथ सिंह हे जोधपूर येथे आले होते.

‘सिंदूर’चा अभ्यासक्रमात समावेश

काही दिवसांपूर्वीच ‘एनसीईआरटी’ने (राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद) त्यांच्या अभ्यासक्रमात ‘ऑपरेशन सिंदूर’चा समावेश केला आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’चे लष्करी व तांत्रिक यश आणि त्यातून दिलेला राजकीय संदेश या सर्व गोष्टी विद्यार्थ्यांना शिकवल्या जाणार आहेत. ‘एनसीईआरटी’ने दोन अभ्यासक्रम जारी केले आहेत. त्याअंतर्गत इयत्ता तिसरी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पहलगाममधील दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर भारतीय लष्कराने राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ या मोहिमेबाबतची माहिती दिली जाणार आहे.

दृढनिश्चयाचे प्रतीक

या अभ्यासक्रमात म्हटले आहे की, पाकिस्तानने पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात त्यांचा सहभाग नसल्याचा दावा केला असला तरी हा हल्ला थेट त्यांच्या लष्करातील अधिकारी व राजकीय नेतृत्वाच्या आदेशानेच झाला होता. त्यानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून शत्रूला चोख प्रत्युत्तर दिले. परंतु, ही केवळ एक लष्करी कारवाई नव्हती. शांततेसाठी व स्वसंरक्षणासाठी उचललेले पाऊल होते. ही मोहीम भारतासाठी सन्मान व दृढनिश्चयाचे प्रतीक आहे.

२०१५ पूर्वीच्या एकतर्फी मध्यस्थांच्या नेमणुका आपोआप रद्द ठरत नाहीत - मुंबई उच्च न्यायालय

पदवीदान समारंभात सरन्यायाधीशांच्या उपस्थितीवर नाराजी; लॉ विद्यापीठाच्या ४५० विद्यार्थ्यांचा CJI सूर्य कांत यांना विरोध

भिवंडीत १७ वर्षीय तरुणाचा लोकलमधून पडून मृत्यू

नगरसेवकांना मिळणार अद्ययावत टॅब; मुंबई महापालिका सभागृहाचा कारभार डिजिटल

विवाहपूर्व तपासणीसाठी पालकांचा खासगी गुप्तहेरांकडे मोर्चा; लोणावळ्यातील लोहगड हत्याकांडानंतर सखोल चौकशीवर भर