राष्ट्रीय

राम मंदिर देणग्या अपहार : चंपत राय यांचाही नोंदवला जबाब

राम मंदिराच्या देणग्यांमधील अपहाराच्या प्रकरणाचा तपास करत असलेल्या अयोध्या पोलिसांनी, श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांचा जबाब नोंदवला आहे. या वादाची 'नैतिक जबाबदारी' स्वीकारून राजीनाम्याची तयारी दर्शवल्यानंतर काही दिवसांतच ही कारवाई करण्यात आली आहे.

Swapnil S

अयोध्या : राम मंदिराच्या देणग्यांमधील अपहाराच्या प्रकरणाचा तपास करत असलेल्या अयोध्या पोलिसांनी, श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय यांचा जबाब नोंदवला आहे. या वादाची 'नैतिक जबाबदारी' स्वीकारून राजीनाम्याची तयारी दर्शवल्यानंतर काही दिवसांतच ही कारवाई करण्यात आली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, या प्रकरणाचा तपास करत असलेले अयोध्याचे सर्कल ऑफिसर आशुतोष तिवारी यांनी स्वतः कारसेवकपुरम येथील चंपत राय यांच्या 'भारत कुटी' निवासस्थानी जाऊन त्यांचा जबाब नोंदवला.

तपासादरम्यान पोलिसांनी राय यांच्याकडे कथित चोरीबाबत तपशील आणि संबंधित कागदपत्रे मागितली आहेत. मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की, कथित चोरीची माहिती मिळाल्यानंतर लगेच एफआयआर नोंदवला नाही, ही आपली चूक असल्याचे राय यांनी कबूल केले आहे. मात्र, पोलीस अधिकाऱ्यांनी ही माहिती 'गोपनीय' असल्याचे सांगत त्यावर भाष्य करण्यास नकार दिला. विशेष म्हणजे, अटकेतील आरोपींपैकी एक असलेला रामाशंकर यादव (उर्फ टिन्नू यादव) हा चंपत राय यांचा माजी ड्रायव्हर आहे. त्याच्याकडे अनेक देणगी पेट्यांच्या चाव्या सापडल्या, जे नियमांचे उल्लंघन होते. दरम्यान, मंगळवारी न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी जिल्हा कारागृहात जाऊन मुख्य आरोपी अविनाश शुक्ला याचीही चौकशी केली.

काँग्रेस नेत्यांना रोखले

दरम्यान, राममंदिरातील ‘लुटी’वर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘मौन’ म्हणजे देशभरातील कोट्यवधी लोकांच्या धार्मिक श्रद्धेवर केलेला ‘थेट हल्ला’ आहे, असा आरोप काँग्रेसने मंगळवारी केला आहे. उत्तर प्रदेश काँग्रेसचे शिष्टमंडळ मंगळवारी प्रभू श्रीरामाचे दर्शन आणि आशीर्वाद घेण्यासाठी अयोध्येला जाणार होते, परंतु उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजय राय यांना पोलिसांनी ‘अटक’ केल्याचा दावाही विरोधी पक्षाने केला आहे. मोदी सरकारने कोणत्याही पारदर्शक निकषांशिवाय किंवा जाहीर चर्चेविना ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र’ ट्रस्टची स्थापना केली आणि त्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सदस्यांची नियुक्ती केली. त्यानंतर, या संपूर्ण ट्रस्टला माहितीच्या अधिकारातून कक्षेबाहेर ठेवण्यात आले. मोदीजी, आता तरी तुमचे मौन सोडा, असे काँग्रेसचे नेते जयराम रमेश म्हणाले.

योगींचा प्रतिहल्ला

राम मंदिर निधी गैरव्यवहार प्रकरणावरून भाजपला लक्ष्य करणाऱ्या विरोधी पक्षांवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारी जोरदार हल्लाबोल केला. ज्यांनी एकेकाळी रामभक्तांवर लाठीचार्ज केला आणि प्रभू रामाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले, तेच लोक आज श्रद्धेच्या नावावर बोलत आहेत, असा घणाघात त्यांनी केला.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

मुंबई, ठाणे, पालघरमध्ये ऑरेंज अलर्ट; दोन दिवस मुंबईत मुसळधार; रायगड जिल्ह्यात रेड अलर्ट 

Mumbai : विद्यार्थ्याचा करुण अंत; चेंबूरमध्ये स्कूल बसवर झाड कोसळले

सचिन अहिर शिंदे सेनेत; ठाकरे गटाला आणखी एक हादरा; थेट 'परिषदे'च्या उपसभापतीपदाची उमेदवारी

Mumbai : मोडकसागर धरणाला गळती; पूर नियंत्रण दरवाजांचे दोन्ही रबर सील नादुरुस्त; दुरुस्तीसाठी पालिका करणार ९८ लाख रुपये खर्च

अमेरिकेत जन्मसिद्ध नागरिकत्व कायम