राष्ट्रीय

Red Fort Blast : दिल्ली स्फोटाचा तपास आता NIA च्या हाती; आत्मघाती हल्ल्याची शक्यता, संशयित डॉक्टरची ओळख पटवण्यासाठी आईची DNA टेस्ट

दिल्लीतील लाल किल्ला परिसरात सोमवारी झालेल्या कार स्फोटाने देशभरात खळबळ उडाली. या घटनेत ९ जणांचा मृत्यू तर २० हून अधिक नागरिक जखमी झाले असून हा स्फोट अपघात नसून पूर्वनियोजित आत्मघाती हल्ला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या संपूर्ण प्रकरणाचा तपास आता राष्ट्रीय तपास संस्था (NIA) करणार आहे.

नेहा जाधव - तांबे

सोमवारी लाल किल्ल्याच्या परिसरात झालेल्या हल्ल्याने संपूर्ण देश हादरला. या घटनेत किमान ९ जणांचा मृत्यू झाला असून २० हून अधिक नागरिक जखमी झाले आहेत. ही घटना अपघात नसून आत्मघाती हल्ला असल्याचा संशय सुरक्षा यंत्रणेने व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर तपासाची सूत्रे राष्ट्रीय तपास संस्थेकडे (NIA) सोपवण्यात आली आहेत. गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला.

दहशतवादी मॉड्युलचा संशय

स्फोट झालेल्या ह्युंदाई i२० कारचा चालक पुलवामातील डॉक्टर उमर नबी असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या हल्ल्यात तो ठार झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कारमध्ये सापडलेला मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत असल्याने त्याची ओळख पटवण्यासाठी नबीच्या आईची DNA टेस्ट करण्यात आली आहे. प्राथमिक तपासात या हल्ल्यामागे जैश-ए-मोहम्मद आणि अन्सार गजवत-उल-हिंद या संघटनांशी संबंधित 'व्हाईट कॉलर' दहशतवादी मॉड्युलचा सहभाग असल्याचे संकेत मिळाले आहेत.

स्फोट पूर्वनियोजित?

घटनास्थळी तपासातून असे स्पष्ट झाले आहे, की स्फोटासाठी कारमध्ये अमोनियम नायट्रेट, इंधन आणि डेटोनेटरचा वापर करण्यात आला होता. तपास पथकांकडे असलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये कारचालक मुखवटा घालून आपली ओळख लपवण्याचा प्रयत्न करताना दिसतोय. विशेष म्हणजे, स्फोट होण्यापूर्वी ही कार जवळपास तीन तासांहून अधिक वेळ तेथे पार्किंगमध्ये उभी होती. त्यामुळे स्फोटाची वेळ आणि ठिकाण पूर्वनियोजित आणि योजनाबद्धरित्या निवडण्यात आली, असा प्राथमिक निष्कर्ष तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे.

कोण आहे उमर नबी?

उमर नबी हा पुलवामा येथील रहिवासी असून फरिदाबादच्या अल फलाह विद्यापीठात मेडिकल सायन्स विभागात कार्यरत होता. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या दृश्यात कार चालवणारी व्यक्ती नबीसोबत मिळती जुळती असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तो फरीदाबाद आणि काश्मीर दरम्यान कार्यरत असलेल्या जैश-ए-मोहम्मद आणि अन्सार गजवत-उल-हिंदशी संबंधित नेटवर्कसोबत जोडला होला.

अटक होण्याची भीती

या घटनेच्या आधी फरीदाबादमधील डॉ. मुझम्मिल अहमद गणाई, डॉ. अदील मजीद रदर आणि डॉ. शाहीन सईद यांना अटक करण्यात आली. हे तिघेही उमर नबीचे सहकारी होते. शाहीन ही जैश-ए-मोहम्मदच्या भारतातील महिला शाखेचे नेतृत्व करत होती. ती जमात-उल-मोमिनत या संघटनेच्या महिला शाखेची प्रमुख होती, असे तपासात समोर आले आहे. आपल्या सहकाऱ्यांना अटक झाल्यावर आपल्यालाही अटक होईल या भीतीने उमर नबीने हल्ला केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

दिल्लीतील सुरक्षा यंत्रणा सतर्क

घटनेनंतर दिल्लीतील सुरक्षा यंत्रणा सतर्क करण्यात आल्या आहेत. लाल किल्ला मेट्रो स्टेशन तात्पुरते बंद ठेवण्यात आले असून सर्व सीमेवरील तपासणी तीव्र करण्यात आली आहे. दर्यागंज आणि पहाडगंज परिसरातील हॉटेल्स, गेस्टहाऊस आणि भाड्याच्या खोल्यांमध्ये रात्रभर शोधमोहीम चालविण्यात आली. विमानतळ, रेल्वे स्थानके आणि बस टर्मिनल्सवर अतिरिक्त तपासणी सुरू आहे.

Bihar Election 2025 : पहिला एक्झिट पोल जाहीर; एनडीए की महागठबंधन...कोण मारणार बाजी?

निठारी हत्याकांडातील आरोपी सुरेंद्र कोली निर्दोष; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, तात्काळ सुटका होणार

Red Fort Blast : दिल्ली स्फोटाचे पुलवामा कनेक्शन? फरिदाबादचा डॉक्टरच ‘बॉम्बर’ असल्याचा संशय

Red Fort Blast : जुने वाहन घेताय? तर सावधान! गाडी खरेदी-विक्री करताना 'या' गोष्टी नक्की लक्षात ठेवा

महाराष्ट्र मंत्रिमंडळ निर्णय : राज्यात न्यायालयीन सुरक्षेत मोठी वाढ; ८ हजारांहून अधिक सुरक्षारक्षकांची नियुक्ती