नवी दिल्ली: 'अॅडव्हान्स्ड मिडीयम कॉम्बॅट एअरक्राफ्ट' उपक्रमासाठी स्वदेशी लढाऊ विमान इंजिन विकसित करण्याचा मानस रिलायन्स इंडस्ट्रीज आणि रोल्स रॉईस यांनी शुक्रवारी व्यक्त केला. भारतातील सर्वात मोठी खाजगी कंपनी आणि ब्रिटनची प्रसिद्ध एरो-इंजिन उत्पादक कंपनी यांच्यातील हा करार देशात स्वदेशी लढाऊ विमानांच्या इंजिन निर्मितीच्या क्षमतेला मोठी चालना देणारा ठरेल.
दोन्ही कंपन्यांनी संयुक्त निवेदनात म्हटले आहे की, त्या भारतात एक समर्पित 'अॅरोस्पेस गॅस टर्बाइन कॉम्प्लेक्स' स्थापन चाचपणी करतील. यामध्ये लढाऊ विमानांच्या इंजिनचे डिझाइन, विकास, उत्पादन, चाचणी आणि त्याच्या संपूर्ण आयुष्यभरातील देखभालीचा समावेश असेल.
प्रस्तावित भागीदारीद्वारे ब्रिटनच्या या नामांकित एरो-इंजिन निर्मात्याचे तंत्रज्ञान व अनुभव आणि रिलायन्सची तांत्रिक, उत्पादन व अंमलबजावणीची क्षमता एकत्र आणून भारतात 'अॅडव्हान्स्ड मीडियम कॉम्बॅट एअरक्राफ्ट' चे इंजिन विकसित केले जाईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'आत्मनिर्भर भारत' उपक्रमांतर्गत भारतीय संरक्षण क्षेत्राला लढाऊ विमान उपक्रमासाठी स्वदेशी इंजिन बनवण्याच्या मोहिमेला पुढे नेणारा हा करार असल्याचे दोन्ही कंपन्यांनी स्पष्ट केले.