पश्चिम बंगालमध्ये येऊ घातलेल्या 'रेमल' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी आपत्ती व्यवस्थापन दलाचे कर्मचारी दक्षिण २४ परगणा जिल्ह्यात खबरदारीची उपाययोजना म्हणून समुद्रकिनाऱ्यावर घोषणा देऊन मच्छीमारांना सावध करत होते. पीटीआय
राष्ट्रीय

Remal Cyclone : प. बंगालमध्ये खबरदारीची उपाययोजना; 'या' जिल्ह्यांत पुरासह वीजपुरवठा-दळणवळण यंत्रणा विस्कळीत होण्याचा इशारा

Swapnil S

कोलकाता : बंगालच्या उपसागरात तयार झालेले रेमल चक्रीवादळ रविवारी सायंकाळी पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या भूमीवर धडकण्याची शक्यता असून त्यासाठी राज्यात खबरदारीची उपाययोजना केली जात आहे. हवामान खात्याने पश्चिम बंगालच्या दक्षिण आणि उत्तर २४ परगणा जिल्ह्यांमध्ये पाऊस, पूर येण्याची शक्यता वर्तवली आहे. वीजपुरवठा आणि दळणवळण यंत्रणा विस्कळीत होण्याचा, तसेच पिके आणि फळबागांचे मोठे नुकसान होण्याचा इशारा दिला आहे.

बंगालच्या उपसागरात तयार झालेले रेमल चक्रीवादळ रविवारी मध्यरात्री पश्चिम बंगालमधील सागर बेट आणि बांगलादेशच्या खेपुपाडा दरम्यान जमिनीवर धडकेल, असे भारतीय हवामानशास्त्र विभागाने शुक्रवारी सांगितले.

बंगालच्या उपसागरातील या मान्सूनपूर्व हंगामातील हे पहिले चक्रीवादळ आहे आणि हिंदी महासागर क्षेत्रातील चक्रीवादळांचे नाव देण्याच्या प्रणालीनुसार त्याला रेमल असे नाव दिले आहे. हे वादळ शनिवारी सकाळपर्यंत बळकट होईल आणि शनिवारी रात्रीपर्यंत आणखी तीव्र होईल.

ते रविवारी मध्यरात्री बांगलादेश आणि पश्चिम बंगाल किनारपट्टीला सागर बेट आणि खेपुपाडा दरम्यान ओलांडण्याची दाट शक्यता आहे.

रविवारी या प्रदेशात ताशी १२० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने २६-२७ मे रोजी पश्चिम बंगाल आणि उत्तर ओदिशाच्या किनारपट्टीच्या जिल्ह्यांमध्ये अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. २७-२८ मे रोजी ईशान्य भारताच्या काही भागात अतिवृष्टी होऊ शकते.

वादळामुळे पश्चिम बंगाल आणि बांगलादेशातील सखल भाग जलमय होण्याची शक्यता आहे. समुद्रात बाहेर पडलेल्या मच्छीमारांना २७ मे पर्यंत किनाऱ्यावर परत जाण्याचा आणि बंगालच्या उपसागरात जाऊ नये, असा सल्ला देण्यात आला आहे. बाधित भागातील लोकांना घरामध्ये राहण्यास आणि असुरक्षित इमारती रिकाम्या करण्यास सांगितले आहे.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस