कोलकाताच्या आर. जी. कर महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार आणि खून केल्याप्रकरणी सियालदह सत्र न्यायालयाने दोषी संजय रॉयला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. तसेच 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. याप्रकरणी शनिवारी मुख्य आरोपी संजय रॉयला दोषी ठरविले होते. न्या. अनिर्बन दास यांनी हे प्रकरण सुनावणीस घेतल्यानंतर 59 दिवसांनी निर्णय सुनावला आहे.
गेल्या ऑगस्ट महिन्यात कोलकातामध्ये सदर घटना घडल्यानंतर देशभरात त्याचे निषेधात्मक पडसाद उमटले. कोलकाता पोलिसांचा नागरी स्वयंसेवक म्हणून काम करणाऱ्या संजय रॉयने गुन्हा केल्यानंतर त्याला दुसऱ्या दिवशी अटक करण्यात आली होती.
सुनावणी झाल्यानंतर न्यायाधीशांनी शनिवारी सांगितले की, आम्ही सर्व पुरावे आणि साक्षीदार तपासले आहेत. तसेच वकिलांचा युक्तिवादही ऐकला. या सर्वांच्या आधारे आरोपी दोषी असल्याचे सिद्ध होते. त्यामुळे त्याला शिक्षा झालीच पाहिजे.
सत्र न्यायालयात सुनावणीदरम्यान आरोपी संजय रॉयने म्हणाला की, ज्यांनी मला फसवले त्यांना का सोडले जात आहे. यावर न्यायाधीशांनी सोमवारी त्याच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकणार असल्याचे सांगितले. तोपर्यंत संजय रॉयची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. संजय रॉयचा इशारा आर. जी. कर महाविद्यालयाचे प्राचार्य संदीप घोष यांच्याकडे होता. ज्यांना पुराव्यात फेरफार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. मात्र कालांतराने त्यांना जामिनावर सोडण्यात आले.
संजय रॉयला जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर, पीडितेचे वकिल म्हटले की, आम्हाला या प्रकरणी दोषीला फाशीची शिक्षा हवी आहे. तर पीडितेच्या वडिलांनी म्हटले की, आम्ही गुन्हेगाराला कठोर शिक्षा व्हावी यासाठी प्रयत्न करत आहोत. आमचा लढा सुरू आहे.
दोषीला फाशी व्हावी - ममता बॅनर्जी
दरम्यान, आजच्या सुनावणी पूर्वी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या विषयी प्रतिक्रिया दिली. बॅनर्जी म्हणाल्या की, आमच्या सरकारने या खटल्यात चौकशीसाठी संपूर्ण सहकार्य केले आहे. आम्ही पहिल्या दिवसापासून दोषीला फाशी व्हावी अशी मागणी करत आहोत. तसेच पीडितेला न्याय मिळावा हीच आमची अपेक्षा आहे.
अतिरिक्त जिल्हा आणि सत्र न्यायाधीश अनिर्बान दास यांच्या न्यायालयात खटला सुरू झाल्यानंतर 57 दिवसांनी हा निकाल देण्यात आला. आरोपीला दोषी ठरवल्यानंतर आज दोन दिवसानंतर (सोमवार,20) दिवसांनी दोषीला शिक्षा ठोठावण्यात आली आहे. या प्रकरणाची सुनावणी 11 नोव्हेंबर रोजी सुरू झाली. उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार घटनेचा तपास करणाऱ्या सीबीआयने या प्रकरणात आरोपपत्र दाखल केले होते. गेल्या वर्षी 9 ऑगस्ट रोजी आर. जी. कर रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागाच्या चौथ्या मजल्यावरील सेमिनार हॉलमधून पीडितेचा मृतदेह आढळून आला होता. घटनेच्या दुसऱ्याच दिवशी मुख्य आरोपी, नागरी स्वयंसेवक संजय रॉय याला अटक करण्यात आली होती.
न्यायालयाच्या निकालानंतर अनेकांनी या निकालाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. तसेच यावरून आता राजकारण रंगताना दिसत आहे. पाहा कोणी काय प्रतिक्रिया दिली.
प.बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निकालानंतर कडक शब्दात आपली प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, निकालाविषयी अजिबात समाधानी नाही, कोलकाता पोलिसांनी फाशीची शिक्षा होईल हे सुनिश्चित करायला हवे होते.
सर्वसामान्यांच्या अपेक्षेनुसार हा निर्णय नाही - अधीर रंजन चौधरी
या खटल्यावर काँग्रेस नेते अधीररंजन चौधरी यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. न्यायालयाच्या निर्णयावर ते म्हणाले की, मुख्य आरोपी आणि या गुन्ह्यात सहभागी असणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी, अशी आम्हाला अपेक्षा होती. हा निकाल सर्वसामान्यांच्या अपेक्षेनुसार नाही.
दोषी संजय रॉयला जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर प. बंगालचे राजकारण तापत आहे. या प्रकरणी आता उच्च न्यायालयात अपिल केली जाणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.