लखनऊ : उत्तर प्रदेशमध्ये मतदार जागृतीसाठी सुरू असलेल्या 'स्वीप' (Systematic Voters’ Education and Electoral Participation) मोहिमेतून भारतीय क्रिकेट संघाचा आक्रमक फलंदाज रिंकू सिंग याला निवडणूक आयोगाने हटवले आहे. समाजवादी पक्षाच्या खासदार प्रिया सरोज यांच्याशी अलिकडेच झालेल्या साखरपुड्यानंतर आयोगाने हा निर्णय घेतला आहे.
निवडणूक आयोगाने जिल्हा प्रशासनाला पत्र पाठवून रिंकू सिंगशी संबंधित सर्व प्रचार साहित्य, जसे की पोस्टर्स, बॅनर्स, होर्डिंग्ज, व्हिडीओज, सोशल मीडिया पोस्ट्स आणि वेबसाईटवरील माहिती तात्काळ हटविण्याचे निर्देश दिले आहेत.
सर्व सामग्री तात्काळ हटविण्यास सुरूवात
मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने सांगितले की, निवडणूक आयोगाकडून प्राप्त झालेल्या सूचनांनंतर सर्व उपजिल्हाधिकारी, निवडणुकीशी संबंधित अधिकारी आणि स्वीप टीमला स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. त्यांनी सांगितले, “आयोग आणि शासनाकडून पत्र प्राप्त झाल्यानंतर रिंकू सिंगशी संबंधित स्वीप अभियानाची सर्व प्रचार सामग्री, ज्यामध्ये पोस्टर, बॅनर, होर्डिंग्ज, व्हिडीओ, सोशल मीडिया पोस्ट आणि वेबसाईटवरील सामग्री यांचा समावेश आहे, ती तात्काळ हटविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.” क्रिकेटपटू रिंकू सिंगला उत्तर प्रदेश राज्याचा आयकॉन मानून 'स्वीप' अभियानाशी जोडण्यात आले होते. मात्र, जेव्हा एखादी व्यक्ती कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित असते किंवा तिचा राजकारणाशी संबंध असल्याची शक्यता असते, तेव्हा तिला मतदार जागृती अभियानाचा भाग बनवता येत नाही. अशा वेळी तिच्या वैयक्तिक आणि राजकीय भूमिका एकमेकांवर परिणाम करू शकतात, असेही कार्यालयाकडून सांगण्यात आले.
साखरपुड्यानंतर आयोगाची कारवाई
गेल्या महिन्यात ८ जून रोजी रिंकू सिंग आणि उत्तर प्रदेशच्या मछलीशहरच्या खासदार प्रिया सरोज यांचा साखरपूडा झाला होता. लखनऊमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये झालेल्या या समारंभात सपा प्रमुख अखिलेश यादव यांच्यासह अनेक प्रमुख राजकारणीही उपस्थित होते. यामुळे आता निवडणूक आयोगाने निष्पक्षता राखण्यासाठी रिंकू सिंगला स्वीप मोहिमेतून हटवले आहे. या कारवाईनंतर सोशल मीडियावर हा मुद्दा चर्चेत आला असून नेटकरी विविध प्रतिक्रिया देत आहेत. दरम्यान, पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये रिंकू आणि प्रिया विवाहबंधनात अडकण्याची शक्यता आहे.