संग्रहित छायाचित्र
राष्ट्रीय

मोदींच्या निमंत्रणाचा स्वीकार; पुतिन भारत दौऱ्यावर येणार

युक्रेन युद्धानंतर अमेरिकेच्या निर्बंधांमुळे परदेश दौरे टाळणारे रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन हे भारत दौऱ्यावर येणार आहेत.

Swapnil S

नवी दिल्ली : युक्रेन युद्धानंतर अमेरिकेच्या निर्बंधांमुळे परदेश दौरे टाळणारे रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन हे भारत दौऱ्यावर येणार आहेत. युद्ध सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच पुतिन हे भारताच्या दौऱ्यावर येत असल्याची माहिती रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव यांनी दिली आहे. पुतिन भारत दौऱ्यावर येणार असून त्याची तयारी सुरू असल्याचे ते म्हणाले. या दौऱ्याच्या तारखांची माहिती त्यांनी दिलेली नाही. अमेरिका आणि रशियात झालेल्या ‘युक्रेन डील’नंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. रशियन इंटरनॅशनल अफेयर्स कौन्सिलद्वारे 'रशिया आणि भारत नवीन द्विपक्षीय अजेंडाच्या दिशेने' या शीर्षकाची एक परिषद आयोजित करण्यात आली होती. याला लावरोव व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित होते.

निमंत्रण स्वीकारले

पुतिन यांनी भारतीय सरकारच्या प्रमुखांचे निमंत्रण स्वीकारले, असे लावरोव यांनी म्हटल्याचे ‘तास’ या सरकारी वृत्तसंस्थेने म्हटले आहे. गेल्या वर्षी पंतप्रधान मोदी पुन्हा निवडून आल्यानंतर त्यांनी रशियाचा पहिला परदेश दौरा केला होता. आता आमची वेळ आहे, असे ते म्हणाले.

पंतप्रधान मोदी यांनी जुलै २०२४ मध्ये रशियाला भेट दिली होती. यावेळी मोदींनी पुतिन यांना भारत भेटीचे आमंत्रण दिले होते. परंतु, अमेरिकेशी बिघडलेले संबंध आणि युद्ध सुरू असल्याने पुतिन यांनी भारत दौरा विचारात घेतला नव्हता. भारताचे रशियाशी दशकांपासूनचे संबंध आहेत. रशिया हा भारताला संरक्षण उपकरणांचा एक प्रमुख पुरवठादार देखील आहे. याशिवाय, युक्रेन युद्धावरून पाश्चात्य निर्बंधांना तोंड देत असलेल्या रशियाने भारताला सवलतीच्या दरात तेल विकले आहे. तसेच भारताने युक्रेन संघर्षावर तटस्थ भूमिका कायम ठेवली आहे. रशियाचा निषेध करणाऱ्या संयुक्त राष्ट्रांच्या ठरावांपासून भारताने स्वतःला दूर ठेवले आहे आणि पुतिन यांच्यावर सार्वजनिक टीका करणेदेखील टाळले आहे.

पेंग्विनची भुरळ कायम! राणीच्या बागेला तीन वर्षांत ३५.३६ कोटींचा महसूल

भटक्या श्वान-मांजरींसाठी १२ कोटींचा खर्च अपेक्षित; नसबंदी, रेबीज लसीकरण मोहीम राबविणार

दिवाळी हंगामात विमान भाडे ३०० टक्क्यांनी वाढले

देशातील न्यायालयात आठ लाख अंमलबजावणी आदेश प्रलंबित; सर्वोच्च न्यायालयाची माहिती

ढाका आंतरराष्ट्रीय विमानतळावर भीषण आग; नऊ विमाने वेगवेगळ्या ठिकाणी उतरवली