नवी दिल्ली : बहुतांशी भारतीयांचे प्रमुख अन्न असलेल्या तांदळाच्या दरात गेल्या वर्षभरात १५ टक्क्याने वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने २९ रुपये किलोने तांदूळ विक्रीसाठी मंगळवारपासून उपलब्ध केला आहे. ५ व १० किलोच्या पॅकमध्ये हा तांदूळ उपलब्ध आहे, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री पीयूष गोयल यांनी दिली.
तांदळाच्या दरांवर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक प्रयत्न करण्यात आले. तरीही सर्वसामान्य जनतेला त्याचा फायदा मिळाला नाही. त्यामुळे सरकारने किंमत स्थिरता निधीच्या मार्गाने हस्तक्षेप करायला सुरुवात केली. त्यामुळे सरकारने २९ रुपये किलोने तांदूळ बाजारात उपलब्ध केला. हा तांदूळ ‘भारत’ ब्रँडने विकला जाणार असून त्यातून मध्यमवर्गीयांना दिलासा मिळेल.
‘भारत तांदळा’च्या प्रत्येक किलोत ५ टक्के कणी असेल. टोमॅटो, कांद्याच्या दरात घसरण होण्यासाठी सरकारने प्रयत्न केले. त्याचा फायदा झाला. गेल्या सहा महिन्यांत गव्हाची महागाई शून्यावर आली आहे. कारण आम्ही ‘भारत आटा’ बाजारात आणला. आता तुम्हाला तांदळाच्या दरातही फायदा दिसू शकेल. दैनंदिन जीवनातील अत्यावश्यक वस्तू किफायतशीर दरात मिळाव्यात, अशी सरकारची इच्छा आहे.
अन्न महामंडळाने ५ लाख टन तांदूळ ‘नाफेड’ व ‘एनसीसीएफ’च्या माध्यमातून विक्रीस आणला आहे. हा तांदूळ केंद्रीय भांडारातूनही उपलब्ध आहे. हा तांदूळ ‘ई-कॉमर्स’ व्यासपीठावरून विकला जाईल.