आई धावत मागे आली, पण क्षणात होत्याचं नव्हतं! स्कॉर्पिओने ३ वर्षांच्या चिमुकल्याला चिरडलं; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO 
राष्ट्रीय

आई धावत मागे आली, पण क्षणात होत्याचं नव्हतं! स्कॉर्पिओने ३ वर्षांच्या चिमुकल्याला चिरडलं; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO

राजस्थानच्या सांचोरमध्ये आईच्या डोळ्यांसमोर स्कॉर्पिओने ३ वर्षांच्या चिमुकल्याला धडक देत सुमारे १० फूट फरफटत नेले. या भीषण अपघातात चिमुकल्याचा मृत्यू झाला असून घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

Mayuri Gawade

आई-वडिलांसोबत दुकानात खेळणारा ३ वर्षांचा चिमुकला अचानक धावत रस्त्यावर आला. त्याला थांबवण्यासाठी आईही त्याच्या मागे धावली. मात्र, काही क्षणांतच भरधाव स्कॉर्पिओने चिमुकल्याला धडक दिली आणि सुमारे १० फूट फरफटत नेले. आईच्या डोळ्यांदेखत घडलेल्या या भीषण अपघातात चिमुकल्याचा मृत्यू झाला. शुक्रवारी (दि.२५) राजस्थानच्या जालोर जिल्ह्यातील सांचोर शहरात ही घटना घडली असून संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

दुकानातून अचानक रस्त्यावर धावला चिमुकला

माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, इंद्रा कॉलनीतील शैतान सिंह यांचे मुख्य बसस्थानकाजवळ कॉस्मेटिकचे दुकान आहे. ते पत्नी आरती देवीसोबत दुकान चालवतात. त्यांचा ३ वर्षांचा मुलगा जेम्पाही त्यांच्यासोबत दुकानात असायचा. शुक्रवारी सकाळी आरती यांनी त्यांच्या दोन मुलींना शाळेत पाठवले आणि जेम्पाला घेऊन दुकानात आल्या.

सकाळी सुमारे १०.१५ वाजता आई-वडील दुकानातील कामात व्यस्त होते. त्यावेळी जेम्पा खेळता खेळता अचानक दुकानातून बाहेर पडला आणि रस्त्याच्या दिशेने धावला.

आईच्या डोळ्यांसमोर भीषण अपघात

आरती मुलाला पकडण्यासाठी त्याच्या मागे धावली. मात्र, ती त्याच्यापर्यंत पोहोचण्याआधीच बसस्थानकाच्या दिशेने आलेल्या स्कॉर्पिओने जेम्पाला तिच्या डोळ्यांसमोर चिरडलं आणि सुमारे १० फूट फरफटत नेलं. काही क्षणांपूर्वी दुकानात खेळणाऱ्या आपल्या चिमुकल्याला डोळ्यांसमोर गाडीखाली जाताना पाहून आरतीला मोठा धक्का बसला. क्षणभर तिला काय करावं, हेच सुचेनासं झालं. चिमुकल्याला वाचवण्यासाठी त्याच्या मागे धावणाऱ्या या आईच्या मनात आपल्या मुलाची हीच शेवटची आठवण कायमची कोरली गेली.

याचवेळी जेम्पाची आजी अनसी देवी धावत रस्त्यावर आल्या आणि त्यांनी त्याला वाहनाखालून बाहेर काढले. गंभीर जखमी अवस्थेत जेम्पाला तातडीने जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

अपघाताचा VIDEO आला समोर

या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. अपघातानंतर चालक घटनास्थळावरून वाहनासह पसार झाल्याचे व्हिडीओमध्ये दिसते. पोलिसांनी नंतर स्कॉर्पिओ जप्त केली असून चालकाचा शोध सुरू आहे. सांचोर पोलिसांकडून या अपघाताचा पुढील तपास केला जात आहे.

२ हजारांवरील UPI पेमेंट शुल्काला स्थगिती देण्यास SC चा नकार; केंद्रासह RBI लाही नोटीस

Pune : "मुलीला घेऊन जा, नाहीतर..." जावयाचा रात्री फोन अन् काही तासांत IT इंजिनिअर वैष्णवीचा मृत्यू; हुंड्यासाठी छळाचा आरोप

मोठी बातमी! CJP च्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी नाकारली परवानगी; अभिजीत दिपकेंकडून २ ऑक्टोबरला 'जेल भरो'ची घोषणा

'बिग बॉस' फेम दिव्या शिंदेचा पुण्यात राडा! ५ लाखांची मागणी, डॉक्टरांच्या घरात घुसून मारहाण; अखेर अटक

SEBI कडे ९ कंपन्यांचे आयपीओसाठी अर्ज