'मला लंडनला जाण्यापासून रोखलं'; ऑक्सफर्डच्या कार्यक्रमासाठी निघालेल्या CJP चे सौरव दास यांचा आरोप, Video (X व्हिडीओ स्क्रीनशाॅट्स)
राष्ट्रीय

'मला लंडनला जाण्यापासून रोखलं'; ऑक्सफर्डच्या कार्यक्रमासाठी निघालेल्या CJP चे सौरव दास यांचा आरोप, Video

ऑक्सफर्ड, केंब्रिज, एलएसई आणि एडिनबरा यांसारख्या प्रतिष्ठित संस्थांनी मला कॉकरोच आंदोलनावर व्याख्याने देण्यासाठी आमंत्रित केले होते. मात्र...

किशोरी घायवट-उबाळे

नवी दिल्ली : परदेशात व्याख्यानासाठी जाण्याच्या तयारीत असलेल्या कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) सहसंयोजक सौरव दास यांना दिल्ली विमानतळावरच रोखण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. सोमवारी (दि. २३) पहाटे लंडनला जाणाऱ्या विमानाने ते प्रवास करणार होते. मात्र, इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी विमानात चढण्यापासून रोखल्याचा आरोप दास यांनी केला आहे. या घटनेसाठी त्यांनी केंद्रातील मोदी सरकारला जबाबदार धरले असून, राजकीय सक्रियतेमुळे आपल्याला लक्ष्य करण्यात आल्याचा दावाही केला आहे.

ऑक्सफर्डमधील कार्यक्रमासाठी होते निमंत्रण

सौरव दास यांना लंडनमधील ऑक्सफर्ड युनियनने आयोजित केलेल्या चर्चासत्रासाठी निमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमात 'कॉकरोच आंदोलन' या विषयावर ते आपले विचार मांडणार होते. पहाटे १ वाजताच्या विमानाने ते लंडनला जाणार होते. मात्र, विमानतळावरील इमिग्रेशन तपासणीदरम्यान त्यांचा प्रवास थांबवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

'सरकारने मला रोखले'

या घटनेनंतर दास यांनी 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेक पोस्ट शेअर केल्या. त्यात त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, "ऑक्सफर्डमध्ये व्याख्यान देण्यासाठी लंडनला जात असताना या भ्याड मोदी सरकारने मला दिल्ली विमानतळावर रोखले. ऑक्सफर्ड, केंब्रिज, एलएसई आणि एडिनबरा यांसारख्या प्रतिष्ठित संस्थांनी मला कॉकरोच आंदोलनावर व्याख्याने देण्यासाठी आमंत्रित केले होते. मात्र, या सरकारने मला लंडनच्या विमानात बसू दिले नाही."

भारतीय विद्यार्थ्यांनी हे कार्यक्रम आयोजित करण्यासाठी मोठी मेहनत घेतली होती. मात्र, आंतरराष्ट्रीय विद्यापीठांमध्ये होणाऱ्या चर्चासत्रांमध्ये आपला सहभाग सरकारला मान्य नसल्याचा आरोपही त्यांनी केला. "भारतीय विद्यार्थ्यांनी हे कार्यक्रम आयोजित करण्यासाठी आपले मन आणि प्राण पणाला लावले. मात्र, या बुद्धिविरोधी सरकारला मी अशा प्रतिष्ठित संस्थांमध्ये जाण्याची भीती वाटत होती," असे दास यांनी म्हटले.

इमिग्रेशन तपासणीदरम्यान पासपोर्ट फ्लॅग?

विमानतळावर नेमके काय घडले, याबाबत माहिती देताना दास यांनी इमिग्रेशन काउंटरवरील तपासणीदरम्यान आपल्या पासपोर्टवर विशेष नोंद असल्याचे समजल्याचा दावा केला. ते म्हणाले, "इमिग्रेशन तपासणीसाठी जाताच माझा पासपोर्ट फ्लॅग करण्यात आल्याचे मला समजले." यानंतर त्यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. सुशिक्षित तरुणाने इतर सुशिक्षित लोकांमध्ये जाऊन वैचारिक चर्चा करण्याची सरकारला एवढी भीती का वाटते, असा सवाल त्यांनी केला.

यावेळी नीरव मोदी आणि विजय मल्ल्या यांचा उल्लेख करत त्यांनी सरकारवर उपरोधिक टीका केली. "मी नीरव मोदी असतो किंवा विजय मल्ल्या असतो, बँकांचे हजारो कोटी रुपये लुटले असते, तर बरं झालं असतं," असे ते म्हणाले. तसेच मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यावरूनही त्यांनी केंद्र सरकारला टोला लगावला.

ऑक्सफर्ड विद्यापीठ की ऑक्सफर्ड युनियन?

दरम्यान, या घटनेनंतर एका स्थानिक पत्रकाराने दास यांच्या कार्यक्रमाबाबत महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. सौरव दास यांचे व्याख्यान थेट ऑक्सफर्ड विद्यापीठात नव्हे, तर ऑक्सफर्ड युनियनमध्ये नियोजित होते, असे या पत्रकाराने स्पष्ट केले. ऑक्सफर्ड युनियन ही स्वतंत्रपणे चालवली जाणारी वादविवाद संस्था आहे. ती प्रसिद्ध आणि प्रतिष्ठित असली, तरी ऑक्सफर्ड विद्यापीठाचा अधिकृत भाग नाही, असेही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले.

'लंडन, पॅरिसला पुन्हा जाणार'

या घटनेमुळे आपले काम थांबणार नसल्याचे दास यांनी स्पष्ट केले. भविष्यात लंडन, पॅरिस आणि इतर ठिकाणी प्रवास करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, CJP चे संस्थापक अभिजीत दिपके यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली. सौरव दास यांना ऑक्सफर्डमधील कार्यक्रमासाठी निमंत्रण मिळाल्याचा सत्तेतील कोणाला तरी मत्सर होत असल्याचा आरोप त्यांनी केला. सुशिक्षित व्यक्तींचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही त्यांनी म्हटले.

आज सौरव दास यांची पत्रकार परिषद

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर आपली बाजू मांडण्यासाठी सौरव दास आज दुपारी ३.३० वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. लंडनला जाणाऱ्या विमानात चढण्यापासून रोखण्यात आल्याच्या घटनेमागील परिस्थिती आणि त्यासंदर्भातील माहिती ते पत्रकार परिषदेत देणार आहेत. कॉकरोच जनता पार्टीने (CJP) यासंदर्भात प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. पत्रकार परिषदेचे ठिकाण जाणून घेण्यासाठी पक्षाच्या टीमशी संपर्क साधण्यास सांगण्यात आले आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : एफडीतील ३० हजार कोटी रुपये गेले कुठे? मोठ्या प्रकल्पासाठी ठेवी मोडल्या - अश्रफ आझमी

नवरा वारंवार माहेरी पाठवायचा, संशय आल्याने बायकोने घरात लावले CCTV; फुटेज पाहून पायाखालची जमीनच सरकली

ठाणे जिल्ह्यात दुष्काळाचे सावट; नाचणी, वरईने मान टाकली; पिकांना ९० ते ९५ टक्के फटका

Nepal Earthquake : नेपाळमध्ये भूकंप; भारतासह 'या' देशांनाही धक्के, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

ताजमहालची सहल आटोपून परतणाऱ्या विद्यार्थ्यांवर काळाचा घाला! उभ्या स्कूल बसला ट्रकची धडक; ४ विद्यार्थ्यांचा मृत्यू, ३२ जखमी