वडोदरा : गुजरातमधील वडोदरा येथे रमझान महिन्याच्या पार्श्वभूमीवर काढण्यात आलेल्या एका आदेशावरून वाद निर्माण झाला आहे. वडोदरा प्रायमरी एज्युकेशन कमिटीने मुस्लिम मुलांसाठी रमझानमध्ये वेगळ्या वेळापत्रकाची घोषणा केल्याचे विश्व हिंदू परिषदेने म्हटले आहे. विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी निदर्शन करून हा आदेश मागे घेण्याची मागणी केली असून हा आदेश मागे घेण्यात आला नाही, तर अशाच पद्धतीची सवलत श्रावण आणि नवरात्रीमध्ये हिंदू विद्यार्थ्यांनाही देण्यात यावी, असेही विश्व हिंदू परिषदेने म्हटले आहे.
गुजरात विश्व हिंदू परिषदेचे प्रवक्ते हितेंद्र राजपूत यांनी फेसबुकवर म्हटले आहे की, मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांचे सरकार यूसीसी (समान नागरिक संहिता) लागू करण्याची तयारी करत आहे, तर दुसरीकडे वडोदरा एज्युकेशन कमिटीने धर्मानुसार, तुष्टीकरणाला प्रोत्साहन देणारे परिपत्रक जारी केले आहे.
विश्व हिंदू परिषदेने 'एक्स'वर म्हटले आहे. कृपया या परिपत्रकाची सत्यता पडताळावी आणि ते तातडीने रद्द करावे. याला जबाबदार असलेल्यांवर कारवाई होणे आवश्यक आहे. तुष्टिकरणाला विरोध असल्यानेच भाजपला मोठे जनसमर्थन मिळाले आहे. हा गुजरात आहे, पाकिस्तान अथवा बांगलादेश नाही. नगर प्राथमिक शिक्षण समितीच्या या परिपत्रकामध्ये म्हटले आहे की, रमझानचा महिना सुरू होत आहे. ज्या शाळांमध्ये मुस्लिम समुदायाचे विद्यार्थी अधिक आहेत, त्यांच्यासाठी वेळेत बदल करण्यात येत आहे. हा बदल १ मार्च २०२५ पासून रमझानदरम्यान लागू केला जाईल.