कारमधून प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशासाठी १ नोव्हेंबरपासून सीट बेल्ट सक्ती करण्यात आली आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी जारी केलेल्या निर्देशानुसार, कारमध्ये बसलेल्या प्रत्येक प्रवाशाला प्रवासादरम्यान सीट बेल्ट परिधान करणे बंधनकारक असणार आहे. दरम्यान, सुरुवातीचे १० दिवस कार चालक आणि प्रवाश्यांना ताकीद देण्यात येईल. तर, ११ नोव्हेंबरपासून दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
कारमध्ये बसणारा प्रत्येक जण सीट बेल्ट लावत आहे की नाही, याची पाहणी वाहतूक प्रशासनाकडून केली जाणार आहे. “कारमधून प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाच्या सुरक्षेकरिता हा निर्णय घेण्यात आला आहे. एखादा प्रवासी सीट बेल्ट न लावताच प्रवास करत असेल, तर त्याच्याविरोधात कडक कारवाई करण्यात येईल,” असे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात आले.
याआधी फक्त वाहनचालकानेच सीट बेल्ट परिधान करणे बंधनकारक होते. मात्र टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा कार अपघातात मृत्यू झाल्यानंतर आता सर्व प्रवाशांकरिता सीट बेल्ट लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. सायरस मिस्त्री हे आलिशान कारमधून जात असताना मागच्या सीटवर बसले असतानाही त्यांचा मृत्यू झाला होता. सीट बेल्टअभावी अपघात झाल्यास, प्रवाशांना स्वत:ला रोखून धरणे कठीण होते. परिणामी त्यांचे शरीर हवेत उडून अनेक गंभीर जखमांना सामोरे जावे लागते.
मुंबई वाहतूक पोलिसांनी प्रत्येक वाहनमालकांना १ नोव्हेंबरपर्यंत आपल्या कारमध्ये सीट बेल्ट बसवण्याचे आदेश दिले होते. आता वाहतूक पोलीस फक्त लायसन्स, वाहनाची कागदपत्रे तसेच हेल्मेट परिधान केले आहे की नाही, हे तपासणार नसून सीट बेल्ट घातला आहे की नाही, हेसुद्धा तपासतील.
“या कामासाठी अतिरिक्त पोलीस तैनात करण्यात येणार नसून चौकीवर असणाऱ्या प्रत्येक वाहतूक पोलिसावर ही जबाबदारी टाकण्यात आली आहे. समजा, एखाद्याच्या कारमध्ये सीट बेल्टची सुविधा नसेल आणि त्यांना या नियमाची माहिती नसेल तर त्यांना स्वत:च्या सुरक्षेसाठी असलेल्या या नियमाबाबत अवगत केले जाईल,” असेही अधिकाऱ्याने सांगितले. आता सीट बेल्ट नसल्यास, मोटार वाहतूक कायदा २०१९ अन्वये १९४ (बी) (१) या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात येईल अन्यथा १ हजार रुपये दंड आकारण्यात येईल.