संग्रहित फोटो
राष्ट्रीय

ज्येष्ठ नागरिकांची सवलत काढून रेल्वेची ८,९०० कोटींची कमाई

कोरोना काळापासून रेल्वेने ज्येष्ठ नागरिकांची रेल्वे तिकिटातील सवलत काढून घेतली आहे. त्यामुळे देशातील रेल्वे प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : कोरोना काळापासून रेल्वेने ज्येष्ठ नागरिकांची रेल्वे तिकिटातील सवलत काढून घेतली आहे. त्यामुळे देशातील रेल्वे प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. ही सवलत काढून घेतल्याने गेल्या पाच वर्षांत रेल्वेने ८,९१३ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

ही बाब माहिती अधिकारातून उघड झाली आहे. ‘सीआरआयएस’ हा रेल्वे मंत्रालयाचा विभाग तिकीट व प्रवाशांची नाेंद ठेवत असते. ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे तिकिटाची सवलत पुन्हा सुरू करावी, अशी मागणी संसदेत अनेक वेळा करण्यात आली. त्यावर रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले होते की, रेल्वे प्रत्येक प्रवाशाला सरासरी ४६ टक्के अनुदान देत आहे.

२० मार्च २०२० मध्ये कोविड काळ सुरू झाल्यानंतर रेल्वेने ज्येष्ठ नागरिकांची सवलत काढून घेतली. त्यावेळी ६० वर्षांवरील पुरुषांना रेल्वे तिकिटात ४० टक्के, तर महिलांना तिकिटात ५० टक्के सवलत मिळत होती.

ज्येष्ठ नागरिकांची सवलत काढून घेतल्याने रेल्वेला किती महसूल मिळाला, याची माहिती मध्य प्रदेशातील माहिती अधिकार कार्यकर्ते चंद्रशेखर गौर यांनी रेल्वेकडे मागितली होती.

२० मार्च २०२० ते २८ फेब्रुवारी २०२५ दरम्यान ३१.३५ कोटी ज्येष्ठ नागरिकांनी प्रवास केला. त्यातून रेल्वेला अतिरिक्त ८,९१३ कोटी रुपये उत्पन्न मिळाले, असे उत्तर रेल्वेने दिले.

२० मार्च २०२० पासून मी अनेकवेळा रेल्वेकडे माहिती अधिकारात माहिती मागवली. त्या माहितीचे विश्लेषण केल्यानंतर मला आढळले की, १८,२७९ कोटी पुरुष, १३.०६५ कोटी महिला व ४३,५३६ तृतीयपंथींनी प्रवास केला.

१९ मार्च २०२५ रोजी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, भारतीय रेल्वेने २०२२-२३ मध्ये प्रवाशांना ५६,९९३ कोटी रुपयांचे अनुदान दिले होते. त्यातून प्रवाशांना किफायतशीर दरात सेवा पुरवली गेली. उदा. प्रवासासाठी १०० रुपये लागत असल्यास आम्ही केवळ ५४ रुपयेच प्रवाशांकडून घेतले, असे वैष्णव म्हणाले.

माहिती कार्यकर्ते गौड म्हणाले की, ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणारी सवलत पुन्हा सुरू करावी. कारण सर्वसामान्य नागरिक त्याच्या आयुष्यात विविध प्रकारचे कर भरत असतो. त्यामुळे त्याला रेल्वेचे तिकीट सवलतीत मिळणे अयोग्य ठरते का? असा सवाल त्यांनी केला.

तिकिटापोटी ज्येष्ठांकडून रेल्वेला मिळाले एकूण २०,१३३ कोटी रु.

रेल्वे मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सवलत बंद केल्यानंतर तिकिटापोटी पुरुष प्रवाशांकडून अंदाजे ११,५३१ कोटी, महिला प्रवाशांकडून ८,५९९ कोटी, तर तृतीयपंथी प्रवाशांकडून रेल्वेला २८.६४ लाख उत्पन्न मिळाले. या सर्वांकडून रेल्वेला २०,१३३ कोटी रुपयांचा एकूण महसूल मिळाला आहे. पुरुष प्रवाशांना असलेली ४० टक्के व महिला प्रवाशांची ५० टक्के सवलत पाहता रेल्वेला अतिरिक्त ८,९१३ कोटी रुपयांचा महसूल मिळाला.

Maratha Reservation : सलग तिसऱ्या दिवशी वाहतूक विस्कळीत; CSMT परिसरात आंदोलकांचे बस्तान

Maratha Reservation: आंदोलनाची धग वाढणार; मनोज जरांगे आजपासून पाणी पिणेही बंद करणार; एकतर विजययात्रा, नाहीतर अंत्ययात्रा

Maratha Reservation : दक्षिण मुंबईत आज पुन्हा कोंडीची शक्यता

Maratha Reservation : CSMT परिसरात अस्वच्छता; राज्यभरातून अन्नपदार्थांचा ओघ वाढल्याने नासाडी

Maratha reservation protest : सुप्रिया सुळेंना आंदोलकांचा घेराव; गाडीवर बाटल्या भिरकावल्या