राष्ट्रीय

सेन्सेक्स ६७१ अंकांनी कोसळला; गुंतवणूकदारांचे २.९१ लाख कोटींचे नुकसान

Swapnil S

मुंबई : जागतिक बाजारातील कमकुवत कलच्या परिणामी भारतीय शेअर बाजारात सोमवारी दोन्ही निर्देशांक सुमारे १ टक्क्यांनी घसरले. सेन्सेक्स ६७१ अंकांनी कोसळला, तर निफ्टीही १९८ अंकांनी घसरला. दोन दिवसांच्या उत्साहानंतर गुंतवणूकदारांनी बँकिंग, धातू आणि एफएमसीजी क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांची विक्री करून नफा कमावला. दरम्यान, भारतीय चलन बाजारात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया सोमवारी १ पैशाने मजबूत होऊन ८३.१४ वर बंद झाला. जागतिक बाजारातील कमकुवत ट्रेंडमुळे बीएसई बेंचमार्क सेन्सेक्स जवळपास १ टक्क्याने घसरल्याने सोमवारी गुंतवणूकदारांचे २.९१ लाख कोटींचे नुकसान झाले. बीएसई-सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल २,९१,७५६.२३ कोटींनी घसरून ३,६६,४०,९६५.०८ कोटी रु. झाले.

शेअर बीएसई सेन्सेक्स ६७०.९३ अंकांनी किंवा ०.९३ टक्क्यानी घसरून ७१,३५५.२२ वर बंद झाला. दिवसभरात तो ७२५.११ अंकांनी किंवा १ टक्क्यांनी घसरून ७१,३०१.०४ वर आला होता. तर एनएसई निफ्टी १९७.८० अंकांनी किंवा ०.९१ टक्क्यानी घसरून २१,५१३.०० वर बंद झाला.

सेन्सेक्सवर्गवारीमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, आयटीसी, नेस्ले, एशियन पेंट्स, टेक महिंद्रा, महिंद्रा अँड महिंद्रा, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि हिंदुस्तान युनिलिव्हर या प्रमुख समभागात घसरण झाली. याउलट, एचसीएल टेक्नॉलॉजीज, पॉवर ग्रिड, सन फार्मा, एनटीपीसी, बजाज फायनान्स आणि टायटन यांचे समभाग वाढले.

आशियाई बाजारात सेऊल, शांघाय आणि हाँगकाँगमध्ये घसरण झाली. जपानचे निक्केई सुट्टीसाठी बंद होते. युरोपियन बाजारातही घसरण झाली. शुक्रवारी अमेरिकन बाजार किरकोळ वधारले.

अमेरिकेकडून अपेक्षेपेक्षा अधिक चांगल्या नॉन-फार्म पेरोल डेटा आणि परिणामी यूएस १०-वर्षांच्या उत्पन्नात वाढ झाल्यामुळे लवकर दर कपात होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे बाजारात मोठ्या प्रमाणावर विक्री झाली. नजीकच्या काळात, गुंतवणूकदाराचे आगामी तिमाही वित्तीय निकालावर निकाल हंगामाकडे लक्ष असेल, असे जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर म्हणाले.

जागतिक तेल बाजारात ब्रेंट क्रूड १.२१ टक्क्यांनी घसरून ७७.८१ अमेरिकन डॉलर्स प्रति बॅरल झाले. तर विदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी (एफआयआय) शुक्रवारी १,६९६.८६ कोटी रुपयांच्या समभागांची खरेदी केली.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त