नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते शरद पवार यांनी बुधवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळे याही उपस्थित होत्या. संसदेतील मोदींच्या कक्षात ही भेट झाली. यामुळे विविध राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
यावेळी पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार यांना अगदी हाताला धरुन आत आणले आणि त्यांचे स्वागत केले. या दोघांचे मनमोकळेपणाने हसतानाचे आणि चर्चा करतानाचे फोटोही समोर आले आहेत.
विद्यार्थी आंदोलनावरुन कधी नव्हे ते मोदी सरकार कोंडीत सापडले असताना शरद पवार यांची अचानक पंतप्रधानांची भेट का घेतली, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे पवार यांनी मंगळवारी जंतरमंतरवर जाऊन अभिजित दीपके व इतर आंदोलकांची भेट घेतली होती.
या भेटीबाबत प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांना विचारले असता, दिल्लीतील आंदोलनावरील मार्ग काढायला गेले असावेत असा तर्क त्यांनी व्यक्त केला.