राष्ट्रीय

लोकसभा अध्यक्षांच्या विरोधात शिवसेनेची सुप्रीम कोर्टात धाव

शिवसेना खासदार विनायक राऊत आणि राजन विचारे यांनी ही याचिका दाखल केली आहे.

वृत्तसंस्था

एकनाथ शिंदे गटाने लोकसभेतील गटनेतेपदी राहुल शेवाळे यांची नियुक्ती केल्यानंतर त्यास लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी मान्यता दिली होती. याप्रकरणी आता शिवसेनेने सुप्रीम कोर्टात धाव घेतली असून लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयाला आव्हान दिले आहे.

शिवसेना खासदार विनायक राऊत आणि राजन विचारे यांनी ही याचिका दाखल केली आहे. लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी बेकायदेशीरपणे, अनियंत्रितपणे आणि एकतर्फी निर्णय घेत आपल्याला गटनेते आणि मुख्य प्रतोदपदावरून काढण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.

शिवसेनेने याचिकेमध्ये आपल्या खासदारांना पुन्हा एकदा त्यांचे पद देण्याची मागणी केली आहे. तसेच, एकनाथ शिंदे गटाकडून करण्यात आलेल्या राहुल शेवाळेंसह इतर नियुक्त्या रद्द करण्याची मागणीदेखील याचिकेत करण्यात आली आहे. लोकसभेतील शिवसेनेच्या बंडखोर खासदारांनी केलेली बेकायदेशीर विनंती मान्य करत अध्यक्षांनी त्यावर कारवाई केली आणि याचिकाकर्त्यांच्या जागी राहुल शेवाळे व भावना गवळी यांची गटनेते आणि मुख्य प्रतोदपदी नियुक्ती करण्यात आल्याचे याचिकेत नमूद केले आहे. लोकसभाध्यक्ष एक मोठे घटनात्मक पद असून त्यांनी पक्षविरोधी कारवाया घडवून आणणे आणि त्यांना चालना देणे दुर्दैवी असल्याचेही याचिकेत म्हटले आहे.

शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे गटात सामील झालेल्या १२ खासदारांचे निलंबन करा, अशी मागणी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे केली आहे. राऊत यांनी लोकसभा अध्यक्षांची भेट घेत पत्राद्वारे निलंबनाची मागणी केली आहे. त्यामुळे आता ओम बिर्ला काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत