राष्ट्रीय

काँग्रेसच्या क्राऊड फंडिंगला अल्प प्रतिसाद; जमले केवळ ११ कोटी

काँग्रेसच्या क्राऊड फंडिंगला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने हायकमांडचा हिरमोड झाला आहे.

Swapnil S

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. या निवडणुकांसाठी आर्थिक नियोजनही महत्त्वाचे असते. त्यामुळे, काँग्रेसने ‘डोनेट फॉर नेशन’ या मोहिमेंतर्गत १८ डिसेंबरपासून क्राऊड फंडिंगची मोहीम सुरू केली होती. तरीही काँग्रेसकडे फक्त ११ कोटी रुपयेच जमल्याचे वृत्त आहे.

काँग्रेसच्या क्राऊड फंडिंगला अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने हायकमांडचा हिरमोड झाला आहे. कमी प्रमाणावर देणगी जमा झाल्याने हायकमांडने नाराजी व्यक्त केली आहे. तसेच कार्यकर्ते आणि नेत्यांना प्रयत्न वाढविण्याचे आदेश दिले आहेत. दोन आठवड्यांत ११ कोटी रुपयांची देणगी पुरेशी नसल्याचे राहुल गांधी, पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि प्रियांका गांधी यांचे मत आहे. आणखी मोठ्या प्रमाणावर पैसे जमा करण्यासाठी प्रयत्न वाढवायला हवेत, अशा सूचनाही या नेत्यांनी संबंधितांना दिल्याचे समजते. काँग्रेसने केलेल्या आर्थिक मदतीच्या या आवाहनास प्रतिसाद देत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसला १ लाख ३८ हजार रुपयांची देणगी दिली आहे.

देशाच्या लोकशाहीचे रक्षण करूया, असे म्हणत पृथ्वीराज चव्हाण यांनी ही मदत काँग्रेस पक्षाला केली आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीपूर्वी प्रचाराची साधनसामग्री जमविण्यासाठी काँग्रेसने १८ डिसेंबरला 'देशासाठी देणगी' मोहीम सुरू केली होती. यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी १.३८ लाख रुपये देणगी देऊन पक्षाच्या ऑनलाईन क्राऊड फंडिंग कार्यक्रमाची सुरुवात केली होती. पक्षाचे संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी सांगितले की, काँग्रेसने क्राऊड फंडिंगद्वारे १३८ रुपये, १३८० रुपये, १३,८०० किंवा १० पट रक्कम देणगी म्हणून देण्याचे आवाहन केले होते.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक

घरांच्या किमती वाढल्याची राज्य सरकारची कबुली