गंगटोक : सिक्कीमच्या छातेन येथील लष्करी तळावर दरड कोसळून तीन जवानांचा मृत्यू झाला, तर सहा जण बेपत्ता झाले आहेत, असे संरक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. मंगन जिल्ह्यातील लाचेन शहरात रविवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे भूस्खलन होऊन ही दुर्घटना घडली.
या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या तीन जवानांची नावे हवालदार लखविंदरसिंग, लान्सनाईक मुनीष ठाकूर आणि पोर्टर अभिषेक लखादा अशी आहेत. त्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. या दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या सहा जणांचा बचाव पथक अहोरात्र शोध घेत आहे. भूस्खलनानंतर चार जणांना वाचवण्यात यश आले आहे. त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. मिझोरामची राजधानी ऐझॉलमध्ये मुसळधार पावसामुळे २ जून रोजी सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ३० मेपासून राज्यात भूस्खलनाच्या २११ घटना घडल्या आहेत. ३० मेपासून सिक्कीममधील लाचेन आणि लाचुंग येथे अडकलेल्या एक हजाराहून अधिक पर्यटकांना सोमवारी बाहेर काढण्यात आले.
ईशान्येकडील राज्यांत पावसाचे ३७ बळी
गेल्या ४ दिवसांपासून सिक्कीमसह ईशान्येकडील राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. पावसामुळे पूर आणि भूस्खलनात आतापर्यंत ३७ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये आसाममध्ये १०, अरुणाचल प्रदेशात ९, मिझोरममध्ये ५ आणि मेघालयात ६ जणांचा समावेश आहे. ईशान्येकडील राज्यांमध्ये मदत आणि बचावकार्यासाठी भारतीय लष्कर, हवाई दल आणि आसाम रायफल्सचे जवान तैनात करण्यात आले आहेत.